मुंबईकरांना हवाबाधा, दिवाळीत प्रदूषणाने गाठला उच्चांक; सर्दी, खोकला, तापाने नागरिक झाले बेजार

दिवाळीतील फटाक्यांच्या अनिर्बंध आतषबाजीमुळे मुंबईतील प्रदूषण रविवारी चिंताजनक पातळीवर पोहोचले. जागोजागी फटाक्यांचा धूर, वातावरणातील धुरके तसेच बांधकाम प्रकल्पांतून बाहेर पडणाऱ्या धुळीचे साम्राज्य यामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली. या प्रदूषित हवेने मुंबईकरांची घुसमट केली असून सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी नागरिक बेजार झाले आहेत. काही ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या वर गेल्याने दिल्लीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईकरांनी धनत्रयोदशीच्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले. आधीच उष्णतेने नागरिकांची प्रचंड लाहीलाही केली होती. तसेच दिवाळी सुरू होऊनही थंडीचा पत्ता नाही. त्यात फटाक्यांची अनिर्बंध आतषबाजी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली व प्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठली. गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी उच्च न्यायालयाने वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेतली होती. त्याचवेळी फटाक्यांच्या आतषबाजीला वेळेची मर्यादा आखून देतानाच बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले होते. यंदा तसे कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फटाके फुटल्याने हवेचा दर्जा गंभीर पातळीपर्यंत खाली घसरला.

रविवारी नोंद झालेला हवेचा गुणवत्ता निर्देशांक

शिवडी – 242, मालाड – 235, बीकेसी – 219, वांद्रे पूर्व – 213, भायखळा – 204

ठाण्यातही प्रदूषण वाढले

ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहचला आहे. याचदरम्यान ध्वनीप्रदूषण 84 डेसिबलच्या सर्वाधिक पातळीवर गेले. पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने धुलीकणांचे प्रमाण घटल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने हवेतील धुळीच्या साम्राज्याचा नागरिकांना त्रास सोसावाच लागला.

नोव्हेंबरमध्येही अवकाळी पाऊस

नोव्हेंबरमध्ये राज्याच्या उर्वरित भागात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिह्यांत वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशीव, लातूर, नांदेडमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गर्भवती महिला, नवजात बालक, वृद्धांना जास्त त्रास

प्रदूषण घातक पातळीवर गेल्यामुळे गर्भवती महिला, अर्भक आणि वृद्ध नागरिकांना याचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. तसेच फुप्फुसाचे विकार, दमा आदी आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीही दमछाक होत आहे. शुक्रवारपासून तीन दिवस हवेची गुणवत्ता खालावली आहे. शुक्रवारी शिवडी येथे 329 इतक्या सर्वाधिक खराब गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली.