अयोध्येत नवीन विमानतळ टर्मिनल उभारणार; संजय राऊत यांच्या प्रश्नावर नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती

अयोध्येतील विमान प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सहा महिन्यांतील विमान प्रवाशांची  संख्या विचारात घेता गर्दीच्यावेळी जास्तीत जास्त प्रवासी क्षमता सामावून घेण्याच्यादृष्टीने अयोध्येत 50 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नवीन टर्मिनल इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. राज्यसभेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

अयोध्या विमानतळावरील प्रवाशांची संख्या विचारात घेता विमानतळावर सध्या उपलब्ध असेल्या सुविधा पुरेशा आहेत का? प्रवासी संख्येतील अंदाजित वाढ व्यवस्थापित करण्यासाठी कोणते विशिष्ट उपाययोजना पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने केल्या जात आहेत. अयोध्येतील हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचा परिणाम स्थानिक समुदायावर झाला आणि काय आर्थिक परिणाम अपेक्षित आहे, असे प्रश्न संजय राऊत यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केले होते. या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या सहा महिन्यांतील विमान प्रवाशांची सविस्तर आकडेवारी सादर करत विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाची माहिती दिली.

अयोध्या विमानतळावरील सध्याची धावपट्टी 2200*45 मीटर असून ती 4सी प्रकारची आहे. तर टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6250 चौरस मीटर आहे, ज्यांची पीक अवरची प्रवासी क्षमता 675 आहे. प्रवासी वाहतुकीतील अंदाजित वाढ लक्षात घेता. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने धावपट्टी 1550 मीटरने वाढवून 3750*45 मीटर केली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी 5675 प्रवासी क्षमता सामावून घेण्यासाठी 50 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नवीन टर्मिनल इमारत नियोजनही केले आहे. पार्किंग वे चा विस्तारही प्रस्तावित असल्याची माहिती राज्यमंत्री मोहोळ यांनी उत्तरात दिली आहे.

अयोध्येला हवाई प्रवास वाढल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, यांसारख्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. स्थानिक प्रवासी वाहतूकीबरोबरच स्थानिक कलाकारांनी उत्पादीत केलेल्या विविध प्रकराच्या वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.