
एअर इंडिया डोमेस्टिक कार्गो येथे विकासाच्या नावाखाली 1987 पासून इंडियन एअरलाईन्स स्थानीय लोकाधिकार समितीने बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अदानी व्यवस्थापनाने काढून टाकलेला होता. तो पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच जागी बसवलेला होता. त्यानंतर अदानी व्यवस्थापनाने पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर पत्रे लाऊन महाराजांना पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त केले होते. याला देखील मागील दोन वर्ष समिती विरोध करत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे, असे समिती तर्फे अदानी व्यवस्थापनाला व पोलीस प्रशासनाला पत्र देऊन कळवले असता अदानी व्यवस्थापनाने अनेक बाऊन्सर व कडक पोलीस बंदोबस्त लाऊन शिवजयंती साजरी करण्यासाठी काही निर्बंध घालून परवानगी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र कोणताही निर्बंध आम्ही सहन करणार नाही, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने सांगितलं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, उपाध्यक्ष प्रदीप बोरकर, उल्हास बिले, संदिप गावडे तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम, एअर इंडिया स्था.लो समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, प्रविण शिंदे हे सर्वजण तिथे जमा झाले.
त्यानंतर अदानी व्यवस्थापनाचा विरोध झुगारून आतमध्ये घुसून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवप्रेमींना संबंधित करता स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव नेते खासदार अनिल देसाई यांना अदानीच्या या कृत्याची माहिती दिली. तसेच याचा निषेध करून अदानीची पैशाची मस्ती कदापी सहन करून घेतली जाणार नाही. येणाऱ्या काही दिवसात या पुतळ्याची जर योग्य ठिकानी पुनःस्थापना करून दिली नाही तर, अदानी व्यवस्थापनाला योग्य तो धडा शिकवला जाईल, असे सांगितले.
कार्यक्रमाला स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सलील कोटकर, अजित चव्हाण, रवी कुडाळकर, अमोल कदम, उमेश सानप, लांजेकर, मयुरेश सावंत तसेच भारतीय कामगार सेना चिटणीस मिलिंद तावडे, राजा ठणगे, सुर्यकांत पाटील, विजय शिर्के तसेच स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेनेचे असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.