अमेरिकेला जाणारं विमान पोहोचलं रशियाला, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने 225 प्रवाशांचे मेगा हाल

एअर इंडियाचे दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे रशियाला वळवण्यात आले. एअर इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांनी एअर इंडियावर निष्काळजीपणाचा आरोप केला. तसेच कोणतीही मदत मिळत नसल्याची तक्रार केली. एअर इंडियाने मात्र प्रवाशांची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.

एअर इंडियाचे विमान एआय-183 गुरुवारी सायंकाळी दिल्लीहून सॅन प्रॅन्सिस्कोसाठी निघाले. मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान रशियाच्या क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले. विमानात 225 प्रवासी होते. बोईंग 777 सुरक्षितपणे रशियाच्या विमानतळावर उतरले. या घटनेनंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले. सर्व प्रवाशांना लवकरात लवकर अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रशियन विमानतळावर कंपनीचा स्टाफ नाही. त्यामुळे तिथे अडकलेल्या प्रवाशांसाठी त्यांना थर्ड पार्टीची मदत घ्यावी लागणार आहे, अशी माहिती एअर इंडियाने ट्विट करून दिली. रशियात अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न-पाण्याची काहीच व्यवस्था नसल्याचे प्राची जैन या महिलेने म्हटलंय. पाच तासांपासून प्रवासी पाणी आणि खाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसात भिजल्याने माझ्या पालकांना थंडी वाजत आहे. त्यांना भूक लागली असून कुणीही त्यांची विचारपूस करत नाहीय, असे ट्विट प्राची जैनने केले.

प्रवाशांची तक्रार

एअरलाईन्सने दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रवाशांनी केलीय. आम्हाला कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. आम्ही विमानतळावर अडकलो आहोत. आमच्याजवळ खायला काही नाही. अपडेट्स दिले नाही, असे प्रवाशांनी म्हटले.

एअरलाईन्सचे स्पष्टीकरण

प्रवाशांनी केलेला दावा कंपनीने फेटाळून लावला आहे. विमान कंपनीला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची काळजी आहे. त्या लोकांना लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची व्यवस्था केली जात आहे.