बॉयफ्रेंड ओरडायचा, नॉनव्हेजही खाऊ देत नव्हता; महिला पायलटने संपवलं जीवन

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पवई परिसरात एअर इंडियाच्या महिला पायलटने आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सृष्टी तुली (वय 25), असं मयत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा बॉयफ्रेंड आदित्य याला अटक केली आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केले आहेत की, आदित्य तिच्याशी गैरवर्तन करायचा आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर ओरडायचा. तसेच तो तिला नॉनव्हेजही खाण्यापासून रोखायचा. तुलीचे त्याच्यावर खूप प्रेम होते. पण त्याच्या वाईट वागणुकीमुळे ती कंटाळली होती, असं मुलींच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

आदित्यने सृष्टीची हत्या करून ही आत्महत्या असल्याचा बनाव रचला, असा आरोप मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केला. सृष्टी अंधेरीच्या मरोळ भागात भाड्याच्या खोलीत राहत होती. सोमवारी सकाळी राहत्या घरी तीच मृतदेह आढळला. आदित्यही पायलट होण्यासाठी तयारी करत होता, अशी माहिती मिळत आहे.

सृष्टी रविवारी ड्युटीवरून परतली असता आदित्यने तिच्याशी भांडण केलं, असा आरोप आहे. यानंतर रात्री 1 वाजता तो दिल्लीला रवाना झाला. सृष्टीने त्याला फोन केला आणि आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं. यानंतर तो पुन्हा सृष्टी राहत असलेल्या अंधेरी येथील घरी आला होता. मात्र घराचा दरवाजाचा आतून बंद होता. यानंतर त्याने चावी बनवणाऱ्याला बोलवलं. चावी बनवून घराचे दार उघडले असता सृष्टी त्याला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली.

आदित्यने यानंतर तिला तातडीने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.