एअर इंडिया आणि विस्तारा या दोन विमानसेवा देणाऱया कंपन्या कमीत कमी 700 कर्मचाऱयांना नारळ देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याबाबत अद्याप अधिकृतपणे काही सांगण्यात आले नसले तरी कर्मचारी कपातीची घोषणा येत्या ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यामुळे कर्मचारी कपातीची टांगती तलवार आहे. निवृत्तीच्या उंबरठय़ावरील कर्मचारी आणि फिक्स्ड टर्म कॉन्ट्रक्ट असलेल्या कर्मचाऱयांना यामधून वगळण्यात येणार आहे. 18 हजार कर्मचारी असलेल्या एअर इंडियाचे ‘विस्तारा’मध्ये विलीनीकरण होणार असल्याची चर्चा आहे. विलीन झालेल्या युनिटमध्ये ‘विस्तारा’च्या सुमारे सहा हजार कर्मचाऱयांना सामावून घ्यावे लागेल. ही समायोजन प्रक्रिया निश्चित झाली असून लवकरच कर्मचारी कपातीची घोषणा होईल, असे एका अधिकाऱयाने सांगितले. साधारण 700 कर्मचाऱयांना कामावर काढून टाकण्याची शक्यता आहे.