हादरवणारी घटना! रुग्णालयातील कर्मचारीच बनला हैवान, व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार अन्…

रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार हरयाणातील गुरुग्राम येथील नामांकित रुग्णालयात घडला आहे. सदर महिला मूळची पश्चिम बंगालमधील असून तिच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेंटिलेटवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. याची तक्रार पीडितने पोलिसात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षांची एअर होस्टेस गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबली होती. तिथे स्विमिंग पूलमध्ये पोहताना ती बुडाला आणि तिची तब्येत बिघडली. त्यामुळे तिला तातडीने मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास एक आठवडा तिच्यावर उपचार सुरू होते.

पीडित महिलेला 5 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आणि 13 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यादरम्यान तिला व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आले होते. 6 एप्रिल रोजी व्हेंटिलेटरवर ठेवलेले असताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडितेने केला आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पीडितेने झाला प्रकार आधी पतीला सांगितला आणि त्यानंतर त्यांनी 112 नंबरवरून पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. सदर पोलिसांनी भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा कर्मचाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

ही घटना घडली तेव्हा मी व्हेंटिलेटरवर होते. झाल्या प्रकाराचे खूप भीतीही वाटत होती आणि अर्धवट बेशुद्धावस्थेतही होते, असेही पीडितेने सांगितले आहे. तिचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी नोंदवून घेतला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.