गुजरातमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; एक वैमानिक ठार, एक जखमी

गुजरातमधील जामनगरमध्ये बुधवारी रात्री लष्कराचे एक लढाऊ विमान कोसळल्याने खळबळ उडली. ही घटना जामनगरपासून 12 किमी अंतरावर असलेल्या सुवार्दा गावाजवळ घडली. विमान कोसळताच विमानाला आग लागली, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले. या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लगेचच तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अपघातात जखमी झालेल्या वैमानिकाला देखील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. यानंतर हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

सदर घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये वैमानिक जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले दिसत आहेत. याचसोबत घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी जमली आहे. तसेच, विमानाचे तुकडे इकडे तिकडे विखुरलेले होते आणि त्याला आग लागली होती, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.

जामनगरमध्ये कोसळलेल्या लष्कराच्या लढाऊ विमानात तांत्रित बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे वायुसेना अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. उड्डाणादरम्यान वैमानिकांना हा तांत्रिक बिघाड आढळून आला. यानंतर त्यांनी एअरफील्ड आणि स्थानिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच विमानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नात एका वैमानिकाला आपला जीव गमवावा लागला तर दुसऱ्या वैमानिकावर जामनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत., असे ते म्हणाले.