
प्रात्यक्षिक पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते उघडले गेले नाही. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीममधील एका पॅरा जंप प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. शनिवारी 5 एप्रिल रोजी सकाळी नियमित सरावादरम्यान आग्रा येथे ही दुर्घटना घडली. रामकुमार तिवारी असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. तिवारी यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामकुमार तिवारी हे हवाई दलात पॅरा जंप प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तिवारी हे शनिवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आग्रा एअरबेसवर सराव करत होते. यावेळी नियोजित डेमो ड्रॉपदरम्यान तिवारी यांनी हेलिकॉप्टरमधून उडी घेतली. मात्र त्यांच्या पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वेळेत उघडू शकले नाही. यामुळे तिवारी खाली कोसळून जखमी झाले.
तिवारी यांना तात्काळ लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिवारी यांची प्राणज्योत मालवली. हवाई दलाने तिवारी यांच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. वॉरंट ऑफिसर तिवारी हे पॅराशूटिंग ऑपरेशन्समध्ये वर्षानुवर्षे अनुभव असलेले अनुभवी प्रशिक्षक होते. तांत्रिक बिघाडाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.