चीन, पाकिस्तानकडून लष्करीकरणावर जोर; हवाईदल प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

हिंदुस्थानचे हवाई दल (IAF) प्रमुख, एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी ‘चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या लष्करीकरणावर’ चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हिंदुस्थानच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर सैन्य वेगानं वाढत आहे.

मंगळवारी 21व्या सुब्रोतो मुखर्जी परिसंवादात ते सहभागी झाले होते. चीनने नुकतीच दोन नवीन स्टिल्थ लढाऊ विमानं विकसित केली आहेत. चीननं लष्कराच्या आधुनिकीकरणावर अधिक जोर दिल्यानं जगभरातून चिंता व्यक्त होत आहे.

जग आज संघर्ष आणि स्पर्धांचं वर्चस्व असलेल्या अनिश्चित स्थितीत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या लष्करीकरणामुळे पश्चिम आणि उत्तर सीमाभागातील सुरक्षेविषयी चिंता निर्माण झाल्याचं एपी सिंग म्हणाले.

चीनने आपल्या अत्याधुनिक स्टिल्थ विमान विकसित करून हवाईदलात त्याचा समावेश केला आहे. चीनकडून हवाई दलात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या गुंतवणुकीचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, ‘चीन त्यांच्या हवाईदलात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून अत्याधुनिक लाढऊ विमानं सेवेत दाखल करत आहे. अलीकडेच त्याच्या नवीन स्टिल्थ विमानाचे लाँचिंग ही एक बाब महत्त्वाची घडामोड आहे’.

‘चीनच्या संदर्भात विचार करता ते फक्त लष्कारातील संख्याच नाही तर तंत्रज्ञान देखील खूप झपाट्यानं वाढवत आहेत’, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

हवाईदल प्रमुखांनी देशाच्या स्वदेशी लढाऊ कार्यक्रमांमध्ये होत असलेल्या विलंबावर, विशेषत: तेजस मार्क-1ए प्रकल्पावर चिंता व्यक्त केली. सध्या अमेरिकेकडून GE-F404 जेट इंजिनच्या संथ पुरवठ्यामुळे तेजस मार्क-1ए प्रकल्पासाठी अडथळा ठरत आहे.