कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींना ‘एआय’ शोधणार

कुंभमेळ्यात ताटातूट झालेल्यांची लवकर भेट होत नाही, असे बॉलीवूड सिनेमांमध्ये दाखवले जाते. पण प्रयागराजमध्ये पुढील महिन्यात सुरू होणाऱया कुंभमेळ्यात असं काही होणार नाही. कारण कुंभमेळ्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आता एआयची मदत घेतली जाणार आहे.

महाकुंभ 2025 साठी संगणकीकृत केंद्र सुरू केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून भाविकांची मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर 1920 हा हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला आहे. 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होतेय. त्यासाठी भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. प्रयागराजमध्ये  जोरदार तयारी सुरू आहे. या सर्व तयारीचा नियमित आढावा घेतला जातोय. महाकुंभमध्ये बदलत्या काळानुसार डिजिटलायझेनवरही भर देण्यात येतोय. त्यानुसार महाकुंभमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे एआयची मदत घेतली जाणार आहे.

महाकुंभमध्ये हरवले-सापडले केंद्र उभारण्यात आले आहे.  याबाबत न्यायदंडाधिकारी ज्ञानप्रकाश म्हणाले,  आम्ही हरवले-सापडले केंद्र संगणकीकृत केले आहे. या माध्यमातून लोकांचे फोटो काढणे, डेटा एकत्र करणे आणि त्याचा डेटाचा वापर करणे शक्य होईल. एआय हे नवं तंत्रज्ञान आहे. तुम्ही शब्दांच्या माध्यमातून डेटा आणि माहिती देऊ शकता. हरवलेल्या व्यक्तीचे स्केच काढण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. लोकांना शोधण्यासाठी त्याचा उपयोग होईल.