राज्यात एआय सीसीटीव्ही कॅमेरे ‘फेस रीडिंग’द्वारे गुन्हेगार ओळखणार

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही लावण्यात येतील. यामुळे ‘फेस रीडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहे. कुणाकडे शस्त्र असल्यास तेसुद्धा या कॅमेऱ्यांमध्ये स्पॅन होणार आहे.

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुण्यातील बिघडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वरील माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरे विविध विभागांद्वारे लावले जातात. त्यामुळे या सर्वांचे संचालन एकाच ठिकाणी करता येईल, अशी कार्यपद्धती तयार करण्यात येईल. यासाठी नगरविकास, गृह आणि औद्योगिक प्रशिक्षण या विभागांची एकत्रित बैठक घेतली जाईल. भविष्यात सर्व विभागांकडून लावण्यात येणाऱ्या ‘सीसीटीव्ही’मध्ये एआयचा उपयोग करण्याविषयीचे धोरण निश्चित केले जाईल, असे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले.

पुणे येथे एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 4 हजार 227 गृह विभागाने, 2 हजार 250 महानगरपालिकेने, तर 2 हजार कॅमेरे मेट्रोद्वारे लावण्यात आले आहेत. त्यांच्या दुरुस्तीचा कालावधी 6 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. दुरुस्ती अभावी पुण्यातील 1300 सीसीटीव्ही बंद आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.