होऊ या डिजिटल साक्षर !

<<< स्वरा सावंत >>>

डिजिटल साक्षरतेचा पाढा एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विद्यार्थीदशेतच घोकवून घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षक सरसावले आहेत. यातून भविष्यातील डिजिटल पिढी आदिवासीबहुल भागात आजपासूनच घडू लागली आहे.

डहाणू तालुक्यातील काही आदिवासी पाड्यांवरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दैनंदिन अध्यापनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू आहे. या शाळांमधील तंत्रस्नेही शिक्षकांनी अध्यापनासाठी नवनवीन पद्धतीची कास धरली. आदिवासी समाजातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत खेचून आणण्यासाठी याच डिजिटल क्रांतीचा वापर केला. या शाळांच्या शिक्षकांनी स्वतःला तंत्रस्नेही बनवल्याने ते विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि इतर शालेय विषयांची संकल्पना अधिक आकर्षक आणि सोप्या पद्धतीने शिकवतात. येथील शिक्षकांनी एआयचा तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात सुरू केला आहे. या उपक्रमाला विविध संस्था आणि उद्योगांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळांना मदतीचा हात दिला आहे.

चॅट जीपीटी टूल्सचा वापर विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठीमध्ये सहज भाषांतरासाठी, एआय टूल्सद्वारे व्हिडीओ आणि प्रतिमातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना सुलभपणे समजावणे सोपे जाते. लेवन लेब्स टूल्सचा वापर विद्यार्थ्यांसाठी खेळ आणि कोडी किंवा रंजक गेम तयार करण्यासाठी होतो. त्यांना अधिक सक्रिय करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉपिलोड कविता, कथा आणि इतर सर्जनशील लेखनप्रकार तयार करण्यास प्रेरित करण्यासाठी केला जातो. इमेज क्रिएटरच्या माध्यमातून विविध एआयचा टूल्सचा वापर आध्यापनात सुरू आहे. व्यक्तिगत शिक्षणासाठी पर्प्लेक्सिटी टूल्सचा उपयोग शैक्षणिक अनुभव देण्यासाठी केला जातो. दृश्य शिक्षण देताना इमेज क्रिएटर आणि ड्रीम लॅब्स टूल्सने आकर्षक प्रतिमा आणि व्हिडीओ तयार करून विद्यार्थ्यांना माहिती अधिक सोप्या पद्धती समजावता येते. सामूहिक कार्य करून घेण्यासाठी गुन्स उपलब्ध असल्याचे शिक्षक सांगतात.

वैयक्तिक प्रगती, खर्चिक बाब आणि नेटवर्क समस्या

अध्ययन, अध्यापनात कठीण संकल्पना सोप्या करून समजावता येतात. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गती आणि शैलीनुसार शिक्षण अनुभव देता येतात. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, समस्यांचे निराकरण करण्यास प्रोत्साहित करतात, असे अनेक फायदे एआय वापराचे आहेत. तरीही ते खर्चिक असल्याने शाळेच्या वापरावर मर्यादा आहेत, तर ग्रामीण भागात व्यवस्थित इंटरनेट नेटवर्क ही मोठी समस्या आहे.

एआयचा वापर शिक्षण क्षेत्रात एक कांतिकारी बदल घडवतो. विद्यार्थी अधिक सर्जनशील बनून शिकवतानाही आपल्याला त्याचे व्यक्तिगत लक्ष वेधून घेता येते. यामुळे शिक्षकांचे कार्य अधिक परिणामकारक होते आणि विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रभावी शिक्षण देण्यास मदत होऊन वातावरण अधिक समृद्ध होते. शिक्षकांना टूल्सचा योग्य वापर शिकवणे आणि शालेय संस्थांमध्ये त्यांची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे.

• आनंद आनेमवाड, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा महालपाडा