मानवी बुद्धिमत्ता-कृत्रिम बुद्धिमत्ता : तुलना

<<< मकरंद भोसले >>>

शेकडो कामं करण्याचं मानवी अष्टपैलुत्व, नव्हे शतपैलुत्व अंगी बाणवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आजतरी दृष्टिक्षेपात नाही. ती जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला वरचढ ठरू शकत नाही. पण भविष्यात हीच कृत्रिम बुद्धिमत्ता जर मानवासारखी शतपैलू झाली, तर तिच्या भावनाशून्यतेमुळे आणि विवेकशून्यतेमुळे ती मानवजातीच्या संहाराला कारणीभूत ठरू शकते. हे करण्यापासून मानवी बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेला रोखू शकेल काय हा खरा कळीचा प्रश्न आहे.

वैज्ञानिकदृष्ट्या मानवी बुद्धिमत्तेचे नऊ वेगवेगळे प्रकार आहेत. हे नऊ प्रकार म्हणजे, गणिती-तार्किक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता, अवकाश-कालात्म बुद्धिमत्ता, सांगीतिक बुद्धिमत्ता, शारीरिक बुद्धिमत्ता, नैसर्गिक बुद्धिमत्ता, भावनिक-बाह्य बुद्धिमत्ता, भावनिक-अंतर्गत बुद्धिमत्ता आणि अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता.

गणित समजणं आणि ती तार्किक दृष्टिकोनातून विचार करून सोडवणं हे ‘गणिती-तार्किक बुद्धिमत्ते’त येतं. गणिताबरोबर विज्ञान विषयातील प्राविण्यसुद्धा याच प्रकारच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. ‘भाषिक बुद्धिमत्ता’ म्हणजे भाषा, शब्द वापरण्याची क्षमता व आवड. या प्रकारच्या बुद्धिमत्तेसाठी उत्तम शब्दसंग्रह, व्याकरणाचे सर्व नियम पाळायची शिस्त, आजवरच्या साहित्याचा अभ्यास आणि स्वतःची आकर्षक भाषाशैली असणं गरजेचं असतं. त्रिमितीय विश्वात नक्की कुठला बिंदू कुठे आहे आणि काळाच्या प्रवाहात ते कसे वाहतात याची मनातल्या मनात ज्यांना उत्तम कल्पना करता येते त्यांच्याकडे ‘अवकाश-कालात्म बुद्धिमत्ता’ आहे असं म्हणता येतं.

भूमिती, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला इत्यादीसाठी बुद्धिमत्तेचं हे अंग आवश्यक असतं. संगीताच्या सर्व पैलूंचं ज्ञान आणि त्यांबद्दलचं आकर्षण ही ‘सांगीतिक बुद्धिमत्ते’ची देणगी आहे. एक चांगला गायक किंवा एक चांगला श्रोता बनण्यासाठी या प्रकारची बुद्धिमत्ता असणं गरजेचं असतं. स्वतःच्या शरीरावर, हालचालींवर उत्तम ताबा असणं म्हणजे ‘शारीरिक बुद्धिमत्ता’ असणं. नर्तक, अभिनेते आणि खेळाडू बनण्यासाठी ही बुद्धिमत्ता आवश्यक असते. निसर्गातील झाडं, पानं, फुलं, आकाश, पाणी, माती, पक्षी, प्राणी यांसारख्या गोष्टींबद्दल आकर्षण, त्यांच्याशी नातं जोडण्याची क्षमता ही ‘नैसर्गिक बुद्धिमत्ते’तून येते. जीवशास्त्रज्ञ, पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी यांना नैसर्गिक बुद्धिमत्ता आवश्यक ठरते.

समाजात वावरताना इतर व्यक्तींशी जुळवून घेणं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्या भावनांबाबत सहानुभूती बाळगणं ही कला ‘भावनिक-बाह्य’ प्रकारच्या बुद्धिमत्तेमुळे येते. लोकसंग्रह करणं, दीर्घकालीन नाती निर्माण करणं, इतर व्यक्तींसोबत चमूत काम करणं यासारखी ‘सॉफ्ट स्किल्स’ भावनिक बाह्य प्रकारची बुद्धिमत्ता वृद्धिंगत केल्याशिवाय जमत नाहीत. स्वतःच्या भावना, विचारप्रक्रिया, क्षमता आणि मर्यादांची योग्य जाण असणं आणि त्याहीपलीकडे आयुष्याचा मार्ग आखण्यासाठी त्यांचा वापर करता येणं हे ‘भावनिक- अंतर्गत’ बुद्धिमत्तेमुळे जमतं. मानसिक शांतता मिळवण्यासाठी या प्रकारची बुद्धिमत्ता आवश्यक असते.

आपल्या मानवी अस्तित्वाबद्दल खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला ‘अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता’ असल्याचं समजलं जातं. जीवनाचा अर्थ लावण्याची दुर्मिळ क्षमता या पद्धतीची बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तींकडे असते.

या नऊ बुद्धिमत्तेतील पहिल्या दोन प्रकारच्या बुद्धिमत्ता या गणित, विज्ञान व भाषा या विषयांत आणि पुढील तीन प्रकारच्या बुद्धिमत्ता या चित्रकला, संगीत आणि खेळ या विषयांत प्राविण्य मिळवून देतात.

या सर्व मानवी बुद्धिमत्तांचा पाया हा आजवरच्या अनुभवाचे विश्लेषण करून भविष्याचा अचूक वेध घेणे हा आहे. या अनुभवाच्या विश्लेषणात या अनुभवातील वारंवार येणारे आकृतिबंध (पॅटर्न) ओळखले जातात आणि त्याच आकृतिबंधांप्रमाणे भविष्यात घडेल असा कयास बांधला जातो. म्हणूनच आपण अनुभवाच्या माध्यमातून अधिक डेटा असलेल्या आणि त्या अनुभवातील डेटाचा विश्लेषणात्मक विचार करू शकणाऱ्या व्यक्तीला बुद्धिमान समजतो.

आजच्या जगात संगणक हा त्याला उपलब्ध असलेले डेटाचे प्रमाण आणि त्या डेटाच्या विश्लेषणाची क्षमता या दोन्ही बाबतीत जगातील कोणत्याही व्यक्तीपेक्षा हजारोपट पुढे आहे. त्यामुळे या वरील पाचही प्रकारच्या बुद्धिमत्तेत आजच्या क्षणाला कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेच्या खूपच पुढे आहे.

प्रश्न आहे तो उरलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्ता, भावनिक-बाह्य बुद्धिमत्ता, भावनिक-अंतर्गत बुद्धिमत्ता आणि अस्तित्वनिष्ठ बुद्धिमत्ता या चार प्रकारच्या बुद्धिमत्तांचा. या चारही बुद्धिमत्ता मात्र पूर्णपणे मानवी आहेत. मानव हा निसर्गाचा भाग असल्याने तो निसर्गाशी अतूटपणे जोडला गेला आहे. मात्र संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला ही अशी नैसर्गिक बुद्धिमत्ता असणं अशक्य आहे. उरलेल्या तिन्ही बुद्धिमत्ता या मानवी भावनांशी आणि विवेकाशी निगडित आहेत. संगणकाला कोणतीही भावना अथवा विवेक नाही. त्यामुळे या चारही प्रकारच्या बुद्धिमत्ता यांत्रिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेत येत नाहीत. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवी मेंदूवर मात करता येत असली तरी मानवी मनाशी निगडित अशा भावना आणि विवेक या गोष्टी मात्र या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिघाच्या बाहेरच आहेत.

शेकडो कामं करण्याचं मानवी अष्टपैलुत्व, नव्हे शतपैलुत्व अंगी बाणवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आजतरी दृष्टिक्षेपात नाही. ती जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तरी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला वरचढ ठरू शकत नाही. पण भविष्यात हीच कृत्रिम बुद्धिमत्ता जर मानवासारखी शतपैलू झाली, तर तिच्या भावनाशून्यतेमुळे आणि विवेकशून्यतेमुळे ती मानवजातीच्या संहाराला कारणीभूत ठरू शकते. हे करण्यापासून मानवी बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेला रोखू शकेल काय हा खरा कळीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर भविष्याच्या उदरात दडलं आहे.

आजच्या घटकेला कोणत्याही मानवी कामासाठी जर पुरेसा डेटा संगणकाला उपलब्ध असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने संगणक ते काम जगातील कोणत्याही माणसापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्या कामाच्या बाबतीत तो माणसापेक्षा वरचढ ठरतो. परंतु तेव्हढ्याच कामापुरता. कारण ती कृत्रिम बुद्धिमत्ता दुसरं मानवी काम करू शकत नाही. त्या बुद्धिमत्तेचं एका कामातलं सखोल शिक्षण तिला दुसऱ्या कामासाठी उपयुक्त ठरत नाही. पण कोणताही सर्वसाधारण माणूस त्याच्या एका दिवसात अनेक कामं करत असतो. गाडी चालवणं, खेळ खेळणं, पत्रव्यवहार करणं इत्यादी. यातलं प्रत्येक काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने माणसापेक्षा जास्त प्रभावीपणे करणारा संगणक आज मिळू शकेल; पण ही सगळी कामं करणारा एक संगणक आजतरी उपलब्ध नाही

[email protected]
(लेखक शिक्षण क्षेत्रात अभ्यासक आहेत.)