अहमदपूर तालुक्यातील गुगदळ व हगदळ शिवारात रात्री एका शेतकरी दाम्पत्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची हत्या केली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य नॅशनल हायवे 361 च्या पूर्वे बाजूस हगदळ शिवारात आपल्या शेतात राहत होते. ते मूळचे रुध्दा ता. अहमदपूर येथील रहिवासी असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली. या वृद्ध दांपत्यावर अनोळखी व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले तर उषाबाई केंद्रे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या. सकाळी उषाबाई केंद्रे शुद्धीत आल्यावर त्या चालत नॅशनल हायवे वर आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारांसाठी दाखल केले. पोलीस स्टेशन अहमदपूर यांना कळवले . या घटनेच्या तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिक ची टीम व पथक पाचारण करण्यात आले होते. नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या करण्यात आली हे अजून स्पष्ट झाले नाही.