प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत लाच घेण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस आल्या आहेत. कालच (26 जून 2024) यवतमाळमध्ये लाच मागितल्याप्रकरणी महसुल सहायकाला ACBने अटक केली होती. असाच प्रकार आता अहमदनगर महानगरपालिकेत घडला आहे. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने चक्क महापालिका आयुक्तांवरच मोठी कारवाई केली असून त्यांचे घर सील करण्यात आले आहे.
डॉ. पंकज जावळे असे लाचखोर आयुक्तांचे नाव आहे. एका कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी परवान्याची आवश्यकता होती. ही परावनगी देण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज सावळे यांनी 8 लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नगर महापालिकेतील लिपिक शेखर देशपांडे याने आयुक्तांच्या मार्फत 8 लाखांची लाच मागितली होती. तसेच 19 आणि 20 जून रोजी लाच मागितल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबी कारवाईनंतर आयुक्त आणि लिपिक हे दोघेही पसार झाले आहेत. एसीबीने आयुक्तांचं घर सील केले आहे. तसेच लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हान नगरमध्ये असणाऱ्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. लाचलुपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त पंकज जावळे याने लिपिक देशपांडे याच्यामार्फत आठ लाखांची लाच मागितली होती. ठरल्याप्रमाणे गुरुवारी लाच स्वीकरण्यात येणार होती. परंतू एसीबीच्या कारवाईची खबर लागताच आयुक्त आणि लिपिक दोघेही पसार झाले. विशेष म्हणजे या दोघांनी गुरुवारी शासकीय रजा टाकल्याची माहिती तपासात उघड झाली.