दूधभुकटी आयातीचे केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखला

राज्यात 20 हजार टन दुधाची भुकटी पडून असताना आणखी 10 हजार टन दुधाची भुकटी आयात करण्याचे राज्य सरकारचे धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक आहे. आयातीचा हा निर्णय रद्द करावा आणि दुधाला उत्पादन खर्चावर आधारित 40 रुपये प्रतिलिटर भाव द्यावा, या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, महायुती सरकारने दूधदराचा निर्णय तातडीने घेतला नाही तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेत त्यांना फटका देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे तसेच स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशद्वारासमोरील चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. आमदार प्राजक्त तनपुरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

गायीच्या दुधाला प्रतिलिटर 40 रुपये बाजारभाव, सरसकट कर्जमाफी, दूध भेसळ व काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली भरारी पथकाची नेमणूक, दुधाचे मागील वर्षाचे 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, मागील गळीत हंगामातील उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये प्रतिटनाप्रमाणे शेतकऱ्यांना मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या.

अजितदादांवर विश्वास कसा ठेवू? – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, ‘चार वर्षांपूर्वी 10 हजार कोटींची तरतूद केली. मात्र, अनेकांना हे पैसे मिळालेच नाहीत. आता 1 जुलैपासून अनुदान जाहीर झाले असले, तरी अद्यापि ते आले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बजेट व भाषणावर विश्वास कसा ठेवायचा?’ असा सवाल शेट्टी यांनी केला. निर्यातबंदी धोरण, कापूस व सोयाबीन परदेशातून आयात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात शेतमाल विकल्याने शेतकऱ्यांवर झालेल्या कर्जाला सरकार जबाबदार ठरले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत दुधाच्या भावाचा निर्णय घ्या; अन्यथा सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.