नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोन वेळा शासनाच्या बदली आदेशाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे अशा मुजोर व दहशत पसरवणाऱ्या अधिकाऱ्याविरूद्ध शासनाने त्वरित शिस्तभंगाची कारवाई करावी अन्यथा त्यांच्या विरोधात दि. 5 आँगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात साकतचे सरपंच तसेच तालुका उपाध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हनुमंत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यांच्या या निवेदनामुळे एकच खळबळ उडाली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद नगर चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची दिनांक 21 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांचे स्वाक्षरीने जिल्हा परिषद ठाणे येथे बदली झाली होती. पण ते बदलीच्या ठिकाणी हजर राहिले नाहीत. त्यानंतर पुन्हा दि. 01 जुलै 2024 रोजी शासनाने त्यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर पालिका परिवहन पुणे येथे केली होती. ही बदली अप्पर मुख्य सचिव सेवा यांचे सहीनेच झालेली होती. ‘महाराष्ट्र शासनाने दोन वेळा बदली करूनही आशिष येरेकर हे बदली झालेल्या ठिकाणी हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी जिल्हा नगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अद्याप सोडलेला नाही.
आशिष येरेकर यांनी शासनाच्या आदेशाचा एक नाही तर दोन वेळा अवमान केलेला आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाचा अवमान केलेला असून त्यांच्या विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही करावी. त्याचबरोबर येरेकर यांचे त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वागणे बरोबर नाही. ते कनिष्ठ अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात प्रत्येक अधिकाऱ्याला होपलेस, युजलेस (Hopless, useless) मूर्ख म्हणून संबोधतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सतत त्रास देऊन, तपासणी करण्याची भीती दाखवून बडतर्फ ( सस्पेंड) करण्याची भीती दाखवून पैसे गोळा करतात. त्यांच्या या त्रासाला कंटाळून बऱ्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी स्व-इच्छा निवृत्ती घेत आहेत, अथवा दीर्घ मुदतीची आजारपणाची रजा टाकून घरीच बसत आहेत. तसेच बदलीचा आदेशालादेखील केराची टोपली दाखवतात. कर्मचाऱ्यांची वारंवार मीटिंग घेऊन त्यामध्ये अश्लील भाषा वापरतात. गेल्या अनेक महिन्यांपासून येरेकर यांचा अन्याय सहन करीत आहेत. या सर्व तक्रारींची नोंद निवेदनात करण्यात आली असून अशा मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात अथवा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा हनुमंत पाटील यांनी दिला आहे.