
‘तू मला सांभाळले नाही तर तुला सोडणार नाही. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल,’ अशी धमकी देणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने कोयत्याने वार करून खून केला. यामध्ये प्रियकराने तिचे शिर धडापासून वेगळे केले. राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात बुधवारी रात्री ही खुनाची घटना घडली. प्रेयसी पुण्याहून प्रियकराला भेटण्यासाठी आली होती. तर खुनानंतर प्रियकर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मयत सोनाली राजू जाधव (वय – 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर सखाराम धोंडिबा वालकोळी (वय – 53, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
सोनाली आणि सखाराम यांचे अनैतिक संबंध होते. दोघेजण काही काळ पती-पत्नीसारखे राहत होते. काही दिवसांपूर्वी सोनाली ही सखारामला सोडून पतीकडे गेली होती. त्यानंतर सोनालीने पुन्हा सखारामला फोन करून सांगितले की, ‘मला तुझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्यासोबत गेले होते, त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तसेच तू मला सांभाळले नाही तर मी तुला सोडणार नाही. तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेल,’ अशी धमकी दिल्याने सखाराम वैतागला होता.
बुधवारी (19) सायंकाळी सोनाली ही सखाराम याला भेटण्यासाठी पुण्याहून नगर येथे आली. नगर बसस्थानकावर दोघांची भेट झाल्यानंतर सखाराम सोनालीला घेऊन राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराशेजारच्या डोंगराजवळ आला. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याने सखाराम याने सोनालीवर कोयत्याने वार केले. यात सोनालीचे शिर धडापासून वेगळे झाले होते.
माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, निरीक्षक संजय ठेंगे, वाल्मीक पारधी, सुनील निकम, आजिनाथ पालवे, अंकुश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.