महालक्ष्मी सोसायटीच्या संचालकांसह 16 जणांवर गुन्हा; महिलेची फसवणूक, गुन्हा दाखल

ठेवीवर जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवीत महिलेकडून नऊ वर्षांपूर्वी नऊ लाखांची ठेव घेत आता ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज अशी 28 लाख 14 हजारांची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालकांसह 16 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ‘एमपीआयडी-1999’चे कलम 3.4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, जि. रायगड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कापडबाजार शाखेत सुरेश सुपेकर व इतर संचालक मंडळाने ठेवीवर जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखविल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण 21 मे 2015 रोजी नऊ लाख 12 हजार 894 रुपयांची ठेव ठेवली होती. या ठेवीवर 30 एप्रिल 2024 पर्यंत जमा झालेले व्याज आणि मुद्दल अशी एकूण 28 लाख 14 हजारांची रक्कम मागण्यासाठी गेलो असता, संचालक मंडळाने चालढकल सुरू केली. अनेकदा पैसे मागूनही न दिल्याने संचालक मंडळाने आमची फसवणूक केली,’ असे स्नेहा राजपाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी हेमा सुपेकर, अशोक गंगाधर गायकवाड, राहुल अरुण दामले, मनीषा दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पारेख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारुतराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरुडे, धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खाडे, चंद्रकांत सुरजमल आनेचा, प्रकाश बाबूलाल बच्छावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, श्यामराव हरि कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे (सर्व रा. नगर) या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तपास करीत आहेत.