अहमदाबादमधील (Ahmedabad) एका पुरुषाने त्याच्या 21 वर्षीय पत्नीने घटस्फोट मागितल्यानंतर तिचे खासगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केल्याचे वृत्त आहे. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक वर्षापूर्वी हे जोडपं लग्नाच्या बंधनात अडकलं. मात्र काही काळापासून दोघे वेगळे राहत होते. वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्याने ही महिला तिच्या पालकांच्या घरी परतली होती. या विभक्ततेनंतर तिने तिच्या पतीला घटस्फोट घेण्याच्या निर्णयाची माहिती दिली. बदला म्हणून, त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ अपलोड आणि शेअर देखील केले, ज्यावर अनेक अश्लील कमेंट्सही होत्या.
तक्रारीनुसार, दोघेही एकाच इंस्टाग्राम अकाउंटचा वापर करत होते, आपापल्या फोनवरून ते अॅक्सेस करत होते. महिला तिच्या पालकांच्या घरी परतल्यानंतरही, तिच्या पतीने अकाउंट अॅक्सेस केला होता.
त्यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क होत असायचा. एकदा महिलेने व्हिडीओ कॉलद्वारे त्याला दाखवले की तिची त्वचेची अॅलर्जी बरी झाली आहे. त्याने तिला ‘पेशंट’ म्हटलं आणि अचानक कॉल बंद केला आणि पुढे दोघांमध्ये कोणतेही संभाषण झाले नाही.
महिलेने सासरी परत न जाण्याचा निर्णय घेतला आणि औपचारिकपणे घटस्फोट मागितला. तिच्या पतीने तिचा खासगी व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट केल्याचा आरोप आहे. तिला व्हिडीओ पोस्ट झाल्याचा कळल्या नंतर तिने गुजरात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी हिंदुस्थानच्या न्याय संहितेच्या कलम 351(2) आणि 356(2) आणि आयटी कायद्याच्या कलम 66(e) आणि 67 अंतर्गत गुन्हेगारी धमकी, अपमान आणि बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.