आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना जागा दाखवू, अहिल्यानगरचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अनेक धक्के सहन केले आहेत. गद्दार बाहेर पडले; मात्र पक्षाला कोणताही फरक पडलेला नाही. आता नगरमधील चार-पाचजण बाहेर पडले असले तरी नगर जिल्ह्यात शिवसेना खंबीरपणे उभी आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत गद्दारांना जागा दाखवून देऊ, असा घणाघात जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नाव न घेता संदेश कार्ले यांच्यावर केला.

नगर तालुक्यातील चार-पाच लोकांनी मिंधे गटात प्रवेश केल्याच्या पाश्र्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या वेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, माजी सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, गोविंद मोकाटे, पोपट निमसे, रा. वि. शिंदे, रवी वाकळे, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, सरपंच विक्रम गायकवाड, निसार शेख, जिवा लगड, रघुनाथ झिने यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शशिकांत गाडे म्हणाले, ‘नगरमधील गद्दार पक्षप्रवेशासाठी मुंबईला जाताना 70 ते 80 गाड्यांचा ताफा असेल असे वाटले होते. मात्र, तीन-चार गाड्या घेऊन गेले, येथेच त्यांची किंमत दिसून आली. संदेश कार्ले यांना पक्षाने दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, एकदा सभापती, जिल्हा उपप्रमुखपद अशी अनेक पदे दिली, तरीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसैनिक त्यांना जागा दाखवून देतील. त्यांचा पराभव केल्याशिवाय मी निवृत्ती घेणार नाही, असा इशाराही गाडे यांनी दिला. शरद झोडगे हे तर कधीही एकनिष्ठ राहू शकत नाहीत, असा टोलाही गाडे यांनी लगावला.

गद्दार गेले तरी नगरमध्ये शिवसेना जोमाने उभी आहे. आता पक्ष संघटना आणखी मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ. नगर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवसेना जोरदार मुसंडी मारेल, असा विश्वासही जिल्हाप्रमुख गाडे यांनी व्यक्त केला.