
अहिल्यानगर महापालिकेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागच्या महिन्यामध्ये पगार न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला होता. वीज बिल थकल्यामुळे अनेक रस्त्यांवर रात्री अंधार असतो. अशी स्थिती असतानाही आता नगर महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये लाखो रुपयांचे दिवे बसविण्यात येणार आहेत.
त्यासाठी येणाऱ्या जवळपास 51 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून महापालिकेचे खरे रुप आता दिसून येत आहे.
महापालिकेची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे अनेक कामे ही ठेका पद्धतीवर दिली आहेत. त्यामध्ये कचऱ्यापासून तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांना चालवण्यास दिले आहे. मोठ्या प्रमाणात वसुली करूनही मागील महिन्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आले नव्हते.
अहिल्यानगर महापालिकेतील कॉन्फरन्स रूम व अधिकाऱ्यांच्या दालनात इलेक्ट्रिक काम करणे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लावण्यासाठी स्थायी समितीने 51 लाख 35 हजार 350 रुपयांची निविदा मंजूर केली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही मंजुरी दिली. शहरात पथदिव्यांची दयनीय स्थिती असताना, दिवसा चालणाऱ्या महापालिका कार्यालयात विद्युत कामावर मोठा खर्च केला जात आहे.
अहिल्यानगर महापालिकेत मागील 16 महिन्यांपासून ‘प्रशासकराज आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे महापालिकेतील प्रशासनाची सर्व सुत्रे आहेत. त्यांनी महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कॉन्फरन्स रुम व अधिकाऱ्यांच्या दालनात इलेक्ट्रिक काम करणे व इलेक्ट्रॉनिक वस्तू बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानुसार शहरातील सबजेल चौकातील रमा विजया इलेक्ट्रिकल्स व शहरातीलच जय मुंजोबा लाईट हाऊस यांना 51 लाख 35 हजार 350 रुपयांचे काम देण्याचे स्थायी समितीत निश्चित केले. त्यामुळे आता महापालिकेत अर्धा कोटीचा उजेड पडणार असल्याची चर्चा शहरात आहे.
शहरातील गुलमोहर रस्त्यासह अनेक रस्त्यांवर पथदिवे नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. मात्र, महापालिकेकडून कार्यालयावर लाखो रुपयांचा विद्युत खर्च होत असल्याचे निविदा मंजुरीतून समोर आले आहे.
नितीन भुतारे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
मागील आठवड्यामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून त्यांनी महापालिकेमध्ये बेकायदा सुरू असलेले बांधकाम व तसेच विविध प्रक्रियासंदर्भात झालेला घोळ, याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे जुन्या महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. आजही ते जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. त्याठिकाणी सोयी-सुविधा नाहीत. साधा हॉलसुद्धा बांधू शकले नाहीत; पण आता नवीन महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामे सुरू झाली आहेत.