नगर जिल्ह्यात दीड महिन्यात 11 खून; आरोपीही गजाआड, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाची कामगिरी

मिलिंद देखणे, अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. अवघ्या दीड महिन्यामध्ये वेगवेगळ्या घटनांतून 11 खून जिल्ह्यामध्ये झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याची दखल घेत गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घडक कारवाई करत व माहिती तंत्रज्ञान अवलंब करत आरोपींना गजाआड केले आहे.

नगर जिल्हा हा सहा जिल्ह्यांच्या सीमा असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातून गुन्हे करणाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सहारा दिला असल्याची उदाहरणे या अगोदर पाहायला मिळालेली आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करावी, या दृष्टिकोनातून तत्कालीन पोलीस अधीक्षक म्हणून पाटील यांनी टू-प्लस ही योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये दोन गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे झाले तर त्याच्यावर तत्काळ तडीपारीची कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले होते. अलीकडच्या काळामध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. सगळ्यात जास्त जबरी चोऱ्या वाढल्या आहेत. चोरी करणाऱ्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये नऊ टोळ्यांवर तडीपारी अथवा मोक्कांतर्गत कारवाई झालेली आहे. एवढे होऊनदेखील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असली, तरी पोलीससुद्धा गुन्हेगारांचा छडा लावण्यामध्ये काही मागे पडलेले नाहीत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने नगर जिल्ह्यातील चोरांचा छडा लावत ‘घडक कारवाई मोहीम’ सुरू केली आहे. शहरासह जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. गेल्या दीड महिन्यात 11 खून झाले आहेत. त्यापैकी शिर्डी, दाणेवाडी, नारायणडोह येथील खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु एलसीबीने (स्थानिक गुन्हे शाखा) या गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दाणेवाडी येथील खुनाच्या गुन्ह्याची उकलदेखील एलसीबीने केली.
दरम्यान, या खुनाचा तपास पूर्ण होत नाही, तोच काल सायंकाळी निंबळक बायपास परिसरात आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे त्याचा आज छडा लागला असून, तो मृतदेह परदेशीनामक व्यापाऱ्याचा असल्याचे उघड झाले आहे. खुनाच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असले, तरी आरोपींना तत्काळ गजाआड करण्यात मात्र एलसीबी यशस्वी ठरत आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील दाणेवाडी येथे 19 वर्षीय तरुणाचा निघृण खून केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. त्याचे शीर आणि हात-पाय धडावेगळे करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांवर मोठा दबाव होता. अशा परिस्थितीत एलसीबीने जलद गतीने तपास करून आरोपीला अटक केली. शिर्डी येथील संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खुनाच्या तपासाचेदेखील मोठे आव्हान होते. नारायणडोह शिवारातील अनोळखी मृतदेह तसेच एमआयडीसी परिसरात वैभव नायकवडी या 1९ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा मृतदेह डिझेल टाकून जाळण्यात आला. दीड महिन्यात असे 11 खून झाले आहेत. हे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाले असले, तरी तपास मात्र एलसीबीने तडीस नेला. केवळ तपासत नव्हे, तर सर्व खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींना बेड्यादेखील ठोकल्या आहेत. एलसीबीच्या या कामगिरीने गुन्हेगार गजाआड झाले असले तरी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची मालिका मात्र अद्यापी थांबलेली नाही.

तांत्रिक विश्लेषणावर भर – दिनेश आहेर
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीला आळा बसावा व तत्काळ गुन्ह्याचा तपास लागावा या दृष्टिकोनातून टीम तयार केल्या आहेत. आम्ही नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून खुनाच्या गुन्ह्याची उकल करीत आहोत. त्यावरून आरोपी तसेच खुनाचे कारण निष्पन्न होते. एलसीबीकडे तांत्रिक विश्लेषणासाठी स्वतंत्र टीम आहे. तसेच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळेच वारंवार ठिकाण बदलून राहणाऱ्या काही आरोपींना एलसीबीने थेट परराज्यातून अटक केली आहे. आपसातील वादातून, चोरीच्या उद्देशानेदेखील गुन्हे घडतात. दाणेवाडीसारख्या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा होता. खुनाचे गुन्हे घडू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्याचा प्रकार, तांत्रिक विश्लेषण तसेच परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही यांसारखे पुरावे तपासात महत्त्वाचे ठरतात, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सांगितले.