अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारीत शपथ घेतील. ते व्हाईट हाऊसमध्ये परतण्याच्या तयारीत असतानाच अमेरिकेतील इमिग्रेशन धोरणांमधील संभाव्य बदलांबाबत, विशेषतः युनिव्हर्सिटी आणि कॉलेजांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कॉलेजांनी परदेशी विद्यार्थ्यांसाठी सूचना जारी केल्या आहेत. ट्रम्प यांची दुसरी टर्म लवकरच सुरू होणार असून यंदा अधिक कठोर नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे युनिर्व्हसिटीत परतण्यासाठी अडथळे निर्माण होऊ नये म्हणून लवकरात लवकर युनिर्व्हसिटीत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या निवडणुकीत 312 इलेक्टोरल मते मिळवून, डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना पराभूत केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी टर्म जिंकली. ते 20 जानेवारी रोजी अधिकृतपणे अमेरिकेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा शपथ घेतील.
18 नोव्हेंबर रोजी यूएस स्टेट डिपार्टमेंट ऑफ स्टेट, ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड कल्चरल अफेअर्सच्या परदेशी विद्यार्थ्यांवरील निष्कर्षांनुसार, 210 हून अधिक विविध ठिकाणांहून आलेल्या 1,126,690 परदेशी विद्यार्थ्यांनी 2023-2024 या शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये उच्चशिक्षणाचा अभ्यास पूर्ण केला. मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत 7 टक्क्यांची वाढ आहे.
ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी, कॉर्नेल युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल लर्निंगच्या कार्यालयाने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की नव्या प्रशासनाच्या अंतर्गत इमिग्रेशन लँडस्केप बदलण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर परदेशी विद्यार्थ्यांना पुढील वर्षी 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सत्राच्या प्रारंभापूर्वी परत येण्याचा सल्ला दिला आहे. किंवा ‘तुमच्या प्रवासाच्या तारखांबद्दल युनिर्व्हसिटीतील सल्लागाराशी संवाद साधा आणि विलंब होणार असेल तर तशी माहिती द्या’.
‘नवं सरकार आल्यानंतर लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आगमन आणि निर्गमनासंदर्भात कडक नियम लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लक्ष्य केलेल्या देशांचे नागरिक समाविष्ट होण्याची शक्यता आहे. किर्गिस्तान, नायजेरिया, म्यानमार, सुदान, टांझानिया, इराण, लिबिया, उत्तर कोरिया, सीरिया, व्हेनेझुएला, येमेन आणि सोमालिया या यादीत समाविष्ट केले जाऊ शकतात, विशेषत: चीन आणि हिंदुस्थान मधील विद्यार्थ्यांवर असे निर्बंध लागू होण्याची शक्यता कमी आहे. मात्र आताच कोणतेही अंदाज बांधता येणार नसल्याचे जाणकार सांगत आहेत.
अमेरिका ॲनेनबर्ग मीडिया या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील मीडिया साइटने अहवाल दिला की युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया ऑफिस ऑफ इंटरनॅशनल सर्व्हिसने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना सूचना दिली की प्रवासाशी संबंधित ‘कोणतेही अडथळे टाळण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे वसंत ऋतुपूर्वी अमेरिकेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. पुढील अभ्याससत्र (सेमिस्टर) 13 जानेवारीपासून सुरू होईल’.