मिंधे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्ष व महायुतीच्या निष्ठेला लाथ मारुन अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. सावंत यांनी केलेल्या गद्दारीमुळे माढा विधानसभा मतदारसंघात पाच खोके सावंत ओके असे फलक झळकू लागले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मीनल साठे यांना शिवाजी सावंत यांनी साथ देण्याऐवजी अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. सावंत यांच्या गद्दारीमुळे महायुतीत अस्वस्थता पसरली आहे.
माढयाचे विद्यमान आमदार बबन शिंदे हे अजित पवार यांच्या गटाचे आहेत. शिंदे यांनी आपल्या मुलासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून सिल्व्हर ओकेच्या अनेक वाऱ्या केल्या. मात्र उमेदवारी पदरात पडली नाही. अजित पवार शिंदे पिता पुत्रांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक असताना देखील शिंदेंनी अजितदादांची उमेदवारी डावलून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. शिंदेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्याने, अजित पवार यांनी मीनल साठे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. महायुतीचा अधिकृत उमेदवार दिल्यानंतर भाजप, मींधे गटाने त्या उमेदवाराचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र मिंधे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी महायुतीेशी गद्दारी करीत रणजीत शिंदे यांना जाहीर पाठींबा जाहीर केला आहे.
शिवाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. तानाजी सावंत हे परांडा विधानसभा मतदार संघात मिंध्याकडून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे बंधू मात्र महायुतीचा धर्म न निभावता माढयात अपक्षाचा प्रचार करणार असल्याने, महायुतीत दुफळी निर्माण झाली आहे. माढयात महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील (शरद पवार राष्ट्रवादी) हे रिंगणात आहेत. इथे रणजीत शिंदे, मीनल साठे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होताना दिसते आहे. पाटील यांनी प्रचार जोरदार आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.