
हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही अशा शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावरून काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केल्याने पुन्हा संताप निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्री कोकाटे यांनी हा सवाल केला. शेतकरी 5 ते 10 वर्षे वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरतच नाहीत. सरकार शेतीमध्ये गुंतवणूकसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार आहे, पण शेतकरी गुंतवणूक करतो का? असे ते म्हणाले. दिवसभर नाशिक शहरात असूनही अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी कृषिमंत्र्यांना उशीर झाला. पक्षाची बैठक आणि इतर बैठकाRना उपस्थिती लावल्याने कृषिमंत्र्यांना दौरा करण्यास उशीर झाला. त्यामुळे शेतकरी ताटकळत होते.
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाददेखील मिळाला, पण या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे. याप्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील, असे कोकाटे म्हणाले.
सद्यस्थितीत पीक विम्याचे चार लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत. सरकार याप्रकरणी कुठेही अडचणीत नाही. अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकांमुळे असे घडले असावे असा अंदाज असून त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे कोकाटे म्हणाले.