कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पडतात, माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले

कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची जीभ पुन्हा घसरली आहे. कांद्याला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावतात आणि भाव पडतात, असे म्हणत कोकाटे यांनी कांद्याचा बाजारभाव पडण्यासाठी शेतकऱ्यालाच जबाबदार धरले आहे.

कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यातच कृषिमंत्री कोकाटे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात. कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे. दुप्पट तिप्पट ठीक, पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दांत कोकाटे यांनी कांद्याच्या बाजारभावावरून शेतकऱ्यांना सुनावले आहे.

कृषिमंत्र्यांनी आपले ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावे – रोहित पवार

कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्य सरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रह्मज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.