मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. दरम्यान, सगेसोयरे शासन निर्णय काढण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीला ओबोसी नेत्यांनी विरोध केल्याचे समजते.
मराठा ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सरकार सर्वमान्य तोडगा काढेल, दोन समाजात कटुता होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यासाठी योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
मागेल त्या मराठय़ाला आरक्षण द्यावेच लागेल -जरांगे
मराठा समाज सहनशील आहे, म्हणून त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका. मराठा समाजाचा आक्रोश समजून घ्या. आम्ही कुणाच्याही हक्काचे मागत नाही. मागेल त्या मराठय़ाला आरक्षण सरकारला द्यावेच लागेल, नसता त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथील मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीत दिला. लातुरात आज मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीच्या निमित्ताने मराठा महासागरच अवतरला होता. या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर तोफ डागली.