
बंगळुरूमधील अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. पत्नीच्या जाचाला कंटाळून अतुल सुभाषने जीवन संपवले होते. अशातच आता उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. TCS कंपनीच्या मॅनेजरने देखील पत्नीच्या जाचाला कंटाळून जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मानव शर्मा असे या मृत टीसीएस मॅनेजरचे नाव होते. तो मूळचा आग्रा येथील डिफेन्स कॉलनीचा रहिवासी होता. मानवने आत्महत्या करण्यापूर्वी एक 7 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्याने पत्नीच्या जाचाला कंटाळून मोठे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. तसेच त्याने आपल्या आई वडिलांची आणि मुलाचीही माफी मागितली. मानव शर्माने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मानवचे वडील हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आहेत.
मानवच्या वडिलांनी या प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. माझ्या मुलाचे लग्न 30 जानेवारी 2024 रोजी झाले. यानंतर सून आणि मुलगा दोघेही मुंबईला गेले. काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. पण त्यानंतर या दोघांमध्येही भांडणं होऊ लागली होती. यानंतर ती आमच्या कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊ लागली. एवढेच नाही तर ती तिच्या प्रियकरासोबत राहायला जाईल, असेही तिने म्हटल्याचे मानवचे वडील म्हणाले.
23 फेब्रुवारी रोजी सून आणि मुलगा मुंबईहून घरी आले. त्याच दिवशी मानव त्याच्या पत्नीला सोडण्यासाठी त्याच्या सासरच्या घरी गेला होता. तिथे मानवला त्याच्या सासरच्यांनी धमकावले आणि दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी पहाटे 5 वाजता माझ्या मुलाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही जेव्हा त्याच्या खोलीत गेलो तेव्हा तो फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. आम्ही लगेचच त्याला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर 26 फेब्रुवारी रोजी मी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे मी सीएम पोर्टलवर तक्रार पत्र लिहिले आहे, असे ते यावेळी म्हणाले.
कोणीतरी कृपया पुरूषांबद्दल विचार करा
दरम्यान, मानवचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओही समोर आला आहे. माफ करा आई आणि बाबा. मी माझ्या बायकोला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरूषांबद्दल बोला, ते खूप एकटे पडतात. माझी बायको मला धमकी देते. मी तर निघून जाईन. पण इतर पुरूषांबद्दल विचार केलाच पाहिजे. बिचारा पुरूष खूप एकटा आहे. पप्पा मम्मी सॉरी, अक्कू सॉरी. मी गेल्यावर सगळं ठीक होईल. मी आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, असे मानवने त्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.