धावत्या ट्रकचं चाक निखळल्यानं ट्रक उलटला, दारुच्या बाटल्या लुटण्यासाठी उडाली झुंबड

उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील अछनेरा भागात ट्रकचा उपघात झाला. दारुच्या बॉक्सने भरलेल्या ट्रकचे चाक निखळले. यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे ट्रक चालकाचे नुकसान झाले. मात्र, रहिवाशांची चांगलीच सोय झाली. अपघाताची माहिती मिळाताच परिसरात दारुच्या बाटल्या लुटण्यासाठी एकच गर्दी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दारुच्या बॉक्सने खचाखच भरलेला एक ट्रक आग्र्याहून अछनेरा येथील दारुच्या दुकानाकडे जात होता. यावेळी अचानक ट्रकचे चाक निखळले. यामुळे चालकाचे ट्रकवरिल नियंत्रण सुटले आणि ट्रक उलटला. दारुने खचखचून भरलेला ट्रक उलटताच घटनास्थळी गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांनी दारुच्या बाटल्या लुटण्यासाठी तोबा गर्दी केली. यामुळे मालकाचे लाखोंचे नुकसान झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पथकाने उर्वरित दारुच्या बाटल्या आणि ट्रक ताब्यात घेतला. या घटनेत त्यांचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दारू व्यापाऱ्याने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.