लखनऊ – आगरा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महाकुंभ मेळाव्याहून घरी परतत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजक ओलांडून एक्स्प्रेसवेच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास आग्रा येथील फतेहाबाद भागात घडली. ओमप्रकाश सिंह (42) आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब महाकुंभ मेळ्यातून घरी परतत होते. यावेळी ओमप्रकाश यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्ता दुभाजक ओलांडून एक्स्प्रेसवेच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ओमप्रकाश, त्यांची पत्नी पूर्णिमा (34), त्यांची मुलगी आहाना (12) आणि चार वर्षांचा मुलगा विनायक यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.