गंभीर! तुटपुंज्या पगारामुळे अग्निवीर बनला चोर; सैन्यात परतण्याऐवजी केली चोरी, पोलिसांकडून अटक

पंजाबमध्ये वाहन चोरी प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की त्या तिघांपैकी एक अग्निवीर आहे.

अग्निवीर इश्मीत सिंग उर्फ ​​इशू, त्याचा भाऊ प्रभप्रीत सिंग उर्फ ​​प्रभा आणि बलकरण सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तिघेही 18 ते 22 वर्षे वयोगटातील आहेत.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक चोरीची कार, एक मोटारसायकल, एक स्कूटर, दोन जिवंत काडतुसेसह देशी बनावटीचे पिस्तूल आणि चोरीचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

या प्रकरणाबाबत मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) संदीप कुमार गर्ग यांनी सांगितलं की, या तीन आरोपींचा परिसरात लूट आणि चोरीच्या अनेक घटनांमध्ये सहभाग होता.

त्यांच्या मोडस ऑपरेंडीबद्दल बोलताना एसएसपी गर्ग म्हणाले की ते ऑनलाइन ॲप्सद्वारे टॅक्सी बुक करायचे आणि नंतर बंदुकीच्या जोरावर चालकांना लुटायचे.

अग्निवीर इश्मीतबद्दल तपशील देताना पोलिसांनी सांगितलं की तो पश्चिम बंगालमध्ये तैनात होता आणि यावर्षी मे महिन्यात एक महिन्याच्या रजेवर पंजाबला आला होता. मात्र तुटपुंज्या पगारामुळे रजेनंतर तो कामावर परतला नाही.

‘तो (इशू) त्याच्या कुटुंबापासून दूर राहत होता, त्याला 20,000 रुपये इतका तुटपुंजा पगार मिळत होता आणि त्याला त्याच्या भविष्याबद्दल खात्री नव्हती, म्हणून त्याला सैन्यात परत यायचं नव्हतं. त्याने गुन्हेगारीकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतं. कारण तो कानपूर, उत्तर प्रदेश येथे शस्त्र खरेदी करण्यासाठी गेला होता, ज्याचा वापर त्याने कार चोरीमध्ये केला’, अशी माहिती एसएसपी गर्ग यांनी दिली.

हिंदुस्थानची न्याय संहिता कलम 307 (मृत्यू, दुखापत किंवा चोरी), 308 (खंडणी), 125 (मानवी जीवन धोक्यात आणणे), 61 (2) (गुन्हेगारी प्रकरण) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात अग्निवीरचा सहभाग असल्याच्या संदर्भात पंजाब पोलिसांनी हिंदुस्थानी लष्कराला पत्रही लिहिलं आहे.