मणिपूरमध्ये वर्षभरापासून हिंसाचार उफाळला आहे. येथील हिंसाचार रोखण्यात केंद्र किंवा राज्य सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये कुकी समाजाने स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाची मागणी केली होती. त्या मागणीला आता जोर चढत आहे.
मणिपूरमधील केंद्र सरकारविरोधातील जनतेचा रोष आणखी तीव्र झाला आहे. त्यापाठोपाठ इथल्या कुकी गटाने स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशासाठी आंदोलन सुरू केले आहे. स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाच्या मागणीसाठी नागरिकांच्या भावना तीव्र होत आहेत. त्यामुळे या मागणीला आता जोर चढत आहे.
मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यात स्वदेशी आदिवासी नेता मंचच्या नेतृत्वात कुकी समाजाचे जोरदार आंदोलन सुरु आहे. सोमवारी संसदेच्या अधिवेशनासोबतच इकडे या आंदोलनालाही सुरवात झाली. स्वदेशी आदिवासी नेता मंचने जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. राज्यातील कुकी वस्ती असलेल्या भागांना स्वतंत्र मान्यता देण्यात यावी, तसेच केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुकीबहुल भागांनी स्वतंत्र प्रशासनाची मागणी लावून धरली असतानाच दुसरीकडे खोऱ्यातील स्थानिक लोक राज्याच्या विभाजनाच्या विरोधात आहेत. कांगपोकपी जिल्हा आणि टेंगनौपल डायमंडसह इतर प्रमुख कुकी-बहुल जिल्ह्यांमध्येही निदर्शने आणि रॅली सुरु आहेत.
मणिपूरमधील हिंसाचारावर केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. राज्यघटनेच्या कलम २३९ अ अन्वये विधानसभेसह केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती व्हावी, अशी इच्छा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.