कृषी सेवा परीक्षेतील 203 उमेदवार दीड वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत, आझाद मैदानात धरणे आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून 203 उमेदवारांची निवड झाली. परीक्षेचा निकाल लागून दीड वर्ष उलटले तरी उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने तातडीने नियुक्ती करावी या प्रमुख मागणीसाठी उमेदवारांनी शुक्रवारपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

‘एमपीएससी’ने मुख्य परीक्षा व मुलाखत घेऊन उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. या सर्व उमेदवारांची कागदपत्रे 17 व 18 ऑगस्ट 2023 रोजी तपासण्यात आली. त्यानंतर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु, नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. याप्रकरणी न्यायालयानेदेखील या उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे आदेश दिले होते. तरीही नियुक्ती मिळत नसल्याने उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.