नांदखेडा येथील मराठा समाज आक्रमक; भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांना घेराव

जालन्यामधील जाफराबादेतील नांदखेडा येथे शुक्रवारी रात्री भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या गावभेटीदरम्यान मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलकांनी दानवे यांना मराठा आरक्षणाविषयी जाब विचारत घेराव घातला होता. शुक्रवारी रात्री भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांचा जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी सर्कलमधील डोलखेडा खुर्द, काचनेरा व नांदखेडा येथे गावभेटीसाठी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान नांदखेडा येथे रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षण अंदोलक मराठा समाज सेवक धिरज पाटील-सवडे यांच्यासह असंख्य मराठा सेवकांनी यांनी घेराव घातला होता.

गेल्या वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आलेली आहे. मराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची सरकारकडून हेटाळणी सुरू असून सरकार जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्यांवर सरकार कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेताना दिसत नाही. आपण सत्ताधारी पक्षात आहात, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काही भूमिका घेतली आहे का? समाजासाठी आपण काही महत्वाचे निर्णय घेणार का?असे अनेक सवाल करत दानवे यांना घेराव घालण्यात आला. करत एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं,कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाय,अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हा विषय आपण पक्षश्रेष्ठीकडे मांडावा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मागणी करावी,अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आमच्या गावात फिरकू देणार नाही, असा इशाराही आंदोलनकांनी दिला. तसेच आगामी निवडणुकीत तुमच्या पक्षाला मतदान करणार नाही. तसेच इतर समाज बांधवांनांही करू देणार नाही. मनोज जरांगे- पाटील यांच्या आदेशाचे पालन करून तुमच्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करू, असा थेट इशाराही मराठा आंदोलकांनी दानवे यांना दिला.