माहुल, चेंबूर येथील एजिस फेडरल इन्शुरन्स वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर 16 वर्षाखालील मुलांसाठी प्रत्येकी 40 षटकांच्या ‘एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी खेळाडूंशी संवाद साधला ते म्हणाले की, “या वयातच मोठ्या खेळी करण्याची सवय लावून घ्या, तुमच्यासाठी 40 षटकांच्या सामन्यांचे आयोजन केले कारण तुम्हाला मोठ्या शतकी खेळी करण्याची सवय लागायला हवी. मात्र तुमच्या खेळात दृढ निश्चय, शिस्त आणि एकाग्रता येईल त्यावेळीच या गोष्टी शक्य होतील”.
एम.आय.जी. क्रिकेट क्लब संघाने प्रातिस्पर्धी क्रिकेट मंत्रास या संघावर 105 धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात 82 धावा आणि दोन बळी मिळवत अष्टपैलू चमक दाखविणारा तनिश शेट्टी त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. यावेळी विजेत्यांना एजिस फेडरलच्या एच.आर.डी. अमोलिका उपळेकर, स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर आणि वेंगसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या एम.आय.जी संघाने 36.3 षटकांत सर्वबाद 168 धावा केल्या. तनीश शेट्टी याने सर्वाधिक 82 धावा केल्या. क्रिकेट मंत्रास संघातर्फे परीन दळवी याने 33 धावांच्या मोबदल्यात 3 तर लक्ष जोगळेकर आणि रूहन चावला यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिकेट मंत्रास संघाच्या वंश चुंबळे (11) आणि रिमाण राखर्डे (13) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दोन आकडी धावा करण्यात अपयश आले आणि केवळ 25.1 षटकांत त्यांच्या डाव 63 धावांत आटोपला. अमर्त्य राजे याने 12 धावांत 3 बळी तर तनीश शेट्टी आणि संचित कदम यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
या स्पर्धेत 198 धावा आणि 8 बळी मिळविणाऱ्या तनीश शेट्टी याची अंतिम सामन्यातील कामगिरी आणि स्पर्धत सर्वोत्तम खेळाडू, तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून परीनं दळवी याची तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून नील वर्मा (दोघेही क्रिकेट मंत्रास) यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :- एम.आय.जी. स्पोर्ट्स क्लब – 36.3 षटकांत सर्वबाद 168 (तनीश शेट्टी 82, यश गानिगा 22, संचित कदम 20, आयुष मकवाना 14, सचिर्थ पुजारी 11; लक्ष जोगळेकर 44 धावांत 2 बळी, परीनं दळवी 33 धावांत 3 बळी, रूहन चावला 32 धावांत 2 बळी) वि.वि. क्रिकेट मंत्रास – 25.1 षटकांत सर्वबाद 63 (वंश चुंबळे 11, रिमाण राखर्डे 13; तनीश शेट्टी 8 धावांत 2 बळी, अमर्त्य राजे 12 धावांत 3 बळी, संचित कदम 9 धावांत 2 बळी).