‘फेमिना मिस इंडिया पश्चिम बंगाल’ शिवांकिता दीक्षित डिजीटल अरेस्टची बळी, 99 हजारांना फसवलं

फेमिना मिस इंडिया शिवांकिता दीक्षित ही डिजिटली अरेस्टची बळी ठरली आहे. शिवांकिताची 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवंकिताच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

उत्तर प्रदेशातील शिवांकिता दीक्षित आग्रा येथे राहते. शिवांकिता दीक्षितला दोन तास डिजिटल अरेस्ट करण्यात आली. आणि यादरम्यान तिला धमकावून 99 हजार रुपये आरोपींनी आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. शिवांकिताचे वडील संजय दीक्षित यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. फसवणुकीची ही घटना मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

आग्रामधील मानस नगरमध्ये राहणारी शिवांकिता दीक्षित 2017 मधील फेमिना मिस इंडिया म्हणून निवडून आली होती. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास राहत्या घरी तीला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख सीबीआय अधिकारी म्हणून दिली. त्याने शिवांकिताला सांगितले की, तिच्या आधार कार्डावर नोंदणीकृत सिमकार्डद्वारे दिल्लीतील एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. एवढेच नाही तर भामट्याने शिवांकितावर मनी लाँड्रिंगचा आरोपही केला. तिला अटक करण्यासाठी सीबीआयचे पथक लवकरच रवाना होणार असल्याचे धमकावले. तिला प्रचंड भीती दाखवून तपासात सहकार्य न केल्यास अटक करण्याचीही धमकी दिली.

यानंतर आरोपीने फोन डिस्कनेक्ट न करण्यास सांगितले आणि नंतर व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. यामध्ये एका खोलीत चार ते पाच अधिकारी बसलेले दिसले. या सर्वांनी शिवांकीताला खूप घाबरवले आणि अवघ्या दोन तासांत त्यांनी तिच्याकडील 99 हजार रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने तिच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.