”आमच्या येथे पैसे कमावणे म्हणजे वाईट मानत नाहीत. परंतु, इस्लाम धर्मात अशी नैतिकता आहे की, जर खुदाने तुम्हाला समाजात एक खास जागा दिली असेल तर तुमचीही समाजाप्रति नैतिक जबाबदारी वाढते.”
आयुष्यभर लोककल्याणाचा वसा जपणाऱ्या प्रिन्स करीम अल हुसैनी आगा खान यांनी आयुष्यभर लोककल्याणाचा वसा जपला. आगा खान नेटवर्क जगातील 30 देशांमध्ये काम करते. यात एक लाखाहून अधिक लोक काम करतात. ही जगातील सर्वात मोठय़ा स्वयंसेवी संस्थांपैकी एक आहे. आगा खान ट्रस्टने हुमायून किल्ला, सुंदर नर्सरीसह दिल्लीतील 60 स्मारकांची दुरुस्ती केली. हैदराबादच्या जवळपास 100 स्मारकांची दुरुस्तीही केली.
आगा खान यांचे खरे नाव प्रिन्स शाह करीम अल हुसैनी होते. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1936 रोजी जिनेव्हा येथे झाला. त्यांचे बालपण केनिया आणि नैरोबी येथे गेले. हावर्ड विद्यापीठातून त्यांनी इस्लामी इतिहास या विषयाची पदवी घेतली. आगा खान यांच्या संस्थेने शिक्षण, आरोग्य आणि जगभरातील ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या इमारतींच्या संरक्षणासाठी मोठे काम केले आहे.
प्रिन्स करीम अल-हैसेनी आगा खान चौथे हे जगभरातील लाखो शिया इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते होते. 20 व्या वर्षी त्यांनी इस्माइली मुस्लिमांचे 49 वे इमाम आणि आध्यात्मिक नेते म्हणून जबाबदारी स्वीकारली.
हैदराबादचा वाडा सरकारला भेट
हिंदुस्थानच्या 25 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रिन्स करीम आगा खान यांनी हैदराबादमधील त्यांच्या वडिलांचा राजवाडा सरकारला भेट दिला होता. येथे एकेकाळी महात्मा गांधींना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील
आगा खान एक दूरदर्शी व्यक्ती होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि महिला सशक्तीकरणात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आध्यात्मिक क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व
एक दृष्टिकोन असलेला नेता, आध्यात्मिक आणि भौतिक क्षेत्रांतील प्रभावी नेतृत्व हरपले. मुस्लिम समाज आणि पश्चिम जग यांच्यातील दुवा असणारे आगा खान येणाऱया पिढय़ांसाठी प्रेरणादायी राहातील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
समाजसेवेचे प्रेरणास्रोत
अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व आगा खानजी केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर जागतिक पातळीवरील समाज सेवेसाठी प्रेरणास्रोत होते. जागतिक शांततेसाठी त्यांनी समाज आणि कार्याचा मेळ साधून अविरतपणे न थकता प्रचंड कार्य केले. आगाखान यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून व्यक्त केल्या आहेत.
रहीम अल हुसैनी उत्तराधिकारी
दरम्यान, आगा खान यांचे पुत्र रहीम अल हुसैनी यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आगान खान यांचीच तशी इच्छा होती. ते आगा खान पाचवे म्हणून ओळखले जातील. 50 वे इमाम आणि आध्यात्मिक नेते म्हणून ते जबाबदारी स्वीकारतील.