‘टी-20 वर्ल्ड कप’ पटकावणाऱ्या हिंदुस्थानच्या टीमच्या शानदार कामगिरीला ‘स्टार’च्या रूपात दाद मिळाली आहे. सऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकलेल्या ‘टीम इंडिया’च्या जर्सीवर आणखी एक स्टार झळकला आहे. याआधी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ने वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी संघाच्या जर्सीवर पहिला स्टार लागला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’मुळे जर्सीवर दुसरा स्टार लागला आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध जिंकलेल्या ‘वर्ल्ड कप’बरोबरच ‘टीम इंडिया’ची जर्सीदेखील चांगलीच चर्चेत आली आहे. हिंदुस्थानातील लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या जर्सीवर दुसऱ्या स्टारची भर पडल्यामुळे तिचे सौंदर्य आणि मान-शान आणखी उंचावला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटची जर्सी असते. क्रिकेट टीम जितके वर्ल्ड कप जिंकते, तितके स्टार जर्सीवर झळकतात. ‘टी-20 वर्ल्ड कप’मधील दुसऱ्या विजयाने ‘टीम इंडिया’ला दुसऱ्या स्टारचे भाग्य लाभले आहे. ‘टीम इंडिया’च्या जर्सीवर हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचा लोगो आहे. या लोगोच्या अगदी वर दोन स्टार झळकले आहेत.
‘टी-20 वर्ल्ड कप 2024’मध्ये हिंदुस्थानने एकही सामना गमावला नाही. सेमी फायनलच्या सामन्यात इंग्लंडचा पार धुव्वा उडवला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करून मानाचा ‘वर्ल्ड कप’ पटकावला.