पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर लाडक्या ब्रुनोनेही आठवडाभरात सोडला प्राण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर अवघ्या आठवडाभरातच त्यांच्या लाडक्या ब्रुनो श्वानाचीही मनाला चटका लावणारी एक्झिट झाली आहे. आमदार पाटील यांच्या निधनानंतर या मुक्या प्राण्याने अन्नपाणी सोडले होते.

गेली साडेचार दशके जिह्याच्या राजकारणात दिग्गज नेते व काँग्रेसशी एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. यामुळे जिल्हा शोकमग्न झाला होता. आता पाठोपाठ आमदार पाटील यांचा लाडका ब्रुनो या श्वानानेही जगाचा निरोप घेतला. राजारामपुरी येथील निवासस्थानी गेल्या नऊ वर्षांपासून घरात सदस्य बनलेला ब्रुनो लाडक्या मालकाचा विरह सहन करू शकला नाही. आमदार पाटील यांच्या निधनानंतर या मुक्या प्राण्याने अन्नपाणी सोडले होते. तर, काल बुधवारी या मुक्या प्राण्याने जीव सोडला.