ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या मान्सूनने ऋतुचक्र पूर्णपणे बिघडवले आहे. त्याचा परिणाम होऊन यंदाचा नोव्हेंबर सन 1901 नंतरचा दुसऱया क्रमांकाचा सर्वात उष्ण नोव्हेंबर महिना ठरला. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हाचे चटके सोसले. त्याप्रमाणे हिवाळय़ाचीदेखील तीव्रता असणार आहे. डिसेंबर अखेरीस नाताळमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट धडकणार आहे. हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हा अंदाज वर्तवला आहे.
सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या अखेरीस थंडी दाखल होते. यंदा पावसामुळे थंडीचा तो मुहूर्त चुकला आणि नोव्हेंबरमध्येही कडक उन्हाचा सामना करावा लागला. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोव्हेंबरमध्ये उष्ण हवामान होते. संपूर्ण महिनाभरात अनेक दिवस पारा 35-36 अंशांच्या पुढे राहिल्यामुळे नोव्हेंबर सर्वाधिक उष्ण ठरला. ज्याप्रकारे उष्णतेने उच्चांकी पातळी गाठली त्याच प्रकारे थंडीच्या लाटेची तीव्रता अधिक असेल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केले आहे. डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत थंडीची लाट धडकणार आहे. ही लाट मुंबई-महाराष्ट्रसह संपूर्ण देशभराला चांगलीच हुडहुडी भरवणार आहे. तीन महिन्यांत चारवेळा थंडीच्या लाटा धडकतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईत आणखी दोन दिवस मळभ
तामीळनाडूमध्ये धडकलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा मुंबई-महाराष्ट्रावर परिणाम झाला आहे. बंगालच्या उपसागरातून आग्नेय आणि पूर्वेकडील वारे प्रवाहित राहिले आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढण्याबरोबरच पुढील दोन दिवस मुंबई शहर व उपनगरात मळभ राहणार आहे. ‘फेंगल’चा मुंबई-महाराष्ट्राच्या वातावरणावर तात्पुरता परिणाम दिसणार आहे. त्यामुळे आठवडाभर तापमानवाढ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.