‘आठवी-अ’च्या तुफान यशानंतर लवकरच ‘दहावी-अ’ वेबसिरीज

शाळेचे दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक हळवा कोपरा असतो. त्या शालेय जीवनाच्या सुखद आठवणींना उजाळा देण्याचे काम ‘इट्स मज्जा’ आणि ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’च्या `आठवी अ’ या वेबसिरीजने केले. ग्रामीण भागातील शालेय जीवनात घडणारे हलके -फुलके प्रसंग या सिरीजने अचूक उभे केले होते. अल्पावधीतच या सिरीजने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. `आठवी अ’ सिरीजच्या तुफान यशानंतर ‘दहावी-अ’ ही दुसरी वेबसिरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच या सिरीजच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली.

‘आठवी-अ’ चे पहिले पर्व 25 भागांचे होते. या पर्वामध्ये ग्रामीण भागातील शाळा, त्यातील काही विद्यार्थी, सातवीनंतर तालुक्याच्या मोठ्या शाळेत आठवीसाठी प्रवेश घेतात, त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी, त्या मुलांचे भावविश्व, किशोरवयीन वयातील घडणारे प्रेम हे मुलांमध्ये होणारे बदल अचूकरित्या दिग्दर्शक नितीन पवार यांनी मांडले आहे. कथा व संवाद त्यांचेच आहेत. नितीन वाडेवाले यांच्यासोबत त्यांनी पटकथा लिहिली आहे. कधीही अभिनय न केलेल्या ग्रामीण भागातील मुलांचा नैसर्गिक अभिनय या सिरीजचे बलस्थान आहे. साताऱ्याचा ग्रामीण बाज तंतोतंत सिरीज मध्ये आलेला आहे. सिरीज मुलांची जरी असली तरी ती कुठेही बालिश वाटत नाही किंवा उपदेशाचे डोस पाजत नाही. हलक्या फुलक्या प्रसंगातून ग्रामीण भागातील मुलांच्या मनाची तगमग मात्र आपल्या पर्यंत पोहोचते. याच सिरीजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली. एका वेगळ्या टप्प्यावर ही सिरीज आलेली आहे. पुढे ही सिरीज काय वळण घेते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कारण दुसऱ्या पर्वात ही मुले दहावीच्या वर्गात गेलेली आहेत.

यामध्य़े अथर्व अधाटे-अभ्या, शृष्टी दणाने-केवडा, संयोगिता चौधरी-रेश्मा, ओम पानस्कर- मधुकर, श्रेयस कटके- किरण, रुद्र इनामदार-इक्या, सत्यजित होमकर-सागर ही शाळकरी मुले आपल्याला सीरिजमध्ये उत्कृष्ट अभिनय करताना दिसतात. ‘आठवी-अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांचे होते. पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली होती. सह-दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन वाडेवाले यांनी सांभाळली होती. संगीत रचना मंदार पाटील यांची होती. अनंत श्रीवास्तव व जेमिन शिगवण यांनी सीरिजची प्रकल्प प्रमुख म्हणून धुरा सांभाळली. अंकिता लोखंडे या क्रिएटिव्ह हेड आहेत तर आर्थिक जबाबदारी विशाल मेनारिया यांनी पार पाडली.