कडक श्रावणानंतर खवय्यांचा काळ्या चिंबोऱ्यांवर ताव

पोलादपूरकरांच्या घरात सध्या चिंबोऱ्यांच्या झणझणीत कालवणाचा घमघमाटच सुटला आहे. कडक श्रावण त्यापाठोपाठ बाप्पाही ‘गावाला’ जाताच खवय्यांची पावले आपोआपच मासळी बाजाराकडे वळू लागली असून काहीजण रोजच ताज्या फडफडीत मासळीवर ताव मारत आहेत. पोलादपूरच्या बाजारात आदिवासी आणत असलेल्या काळ्या चिंबोऱ्यांवर नागरिकांच्या उड्या पडत आहेत. त्यामुळे भातशेतीच्या लागवडीनंतर हाताला फारसे काम नसलेल्या आदिवासींच्या कनवटीला चार पैसे खुळखुळू लागले आहेत.

पावसाळा कमी होताच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नद्यांमधील गढूळ पाणी हळूहळू निवळू लागते. या स्वच्छ पाण्यात रात्रीच्या वेळी काळ्या चिंबोऱ्या पकडल्या जातात. पोलादपूर तालुक्यातील अनेक भागात आदिवासी अशा चिंबोऱ्या पकडून पोलादपूरच्या बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. श्रावण त्यापाठोपाठ गणपती विसर्जन झाले असल्याने खवय्यांच्या उड्या या चिंबोऱ्यांवर पडत आहेत. 300 रुपयांना सहा नग मिळत असतानादेखील पोलादपूरकर तसेच महाबळेश्वर व मुंबई, कोकणात ये-जा करणारे प्रवासी, पर्यटकदेखील या आदिवासींकडून चिंबोऱ्या विकत घेताना दिसत आहेत. चिंबोऱ्यांबरोबरच गोड्या पाण्यातील लहान माशांनाही मोठी मागणी वाढली आहे. चिंबोऱ्या पकडण्यासाठी आदिवासी बांधव पारंपरिक पद्धतीच्या बांबूपासून बनवलेल्या विशिष्ट प्रकारच्या टोके पद्धतीचा वापर करत असल्याचे राधाबाई चव्हाण या आदिवासी महिलेने सांगितले.