शिवराज सिंह चौहानांनंतर पंजाब भाजप अध्यक्षांना विमानात मिळाली तुटलेली खुर्ची, X वरून व्यक्त केला संताप

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दोन दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या विमानात तुटलेली खुर्ची बसायला मिळाली होती. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावरून संतापही व्यक्त केला होता. ही घटना ताजी असतानाच पंजाबमधील भाजपचे अध्यक्ष सुनील जखार यांच्यासोबतही इंडिगो कंपनीच्या विमानात असाच प्रकार घडला. जखार यांनी X वर इंडिगोच्या विमानातील तुटलेल्या खुर्चीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुनील जाखर हे 27 जानेवारीला चंदिगढहून इंडिगोच्या विमानाने दिल्लीला जात होते. त्या फ्लाईटमध्ये त्यांना देण्यात आलेल्या खुर्चीची गादी निघालेली होती. त्याविषयी त्यांनी विमानातील केबिन क्रूला सांगितले मात्र त्यांनी याविषयी आपण मदत करू शकत नसून कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवायला सांगितले. जाखर यांनी त्यांना आलेला अनुभव X वर शेअर केला आहे.

”शिवराज सिंह चौहान यांनी दाखवून दिलेल्या तुटलेल्या खुर्च्या या फक्त एअर इंडियामध्ये नाहीत. 27 जानेवारीची चंदिगढ दिल्लीच्या इंडिगोच्या विमानाचे काही फोटो शेअर करत आहे. त्यात स्पष्ट दिसतंय की सीट्सच्या गाद्या ढिल्या पडल्या आहेत, तसेच या खुर्च्या प्रवाशाच्या सुरक्षेची काळजी घेऊन बसवलेल्या नाहीत. केबिन क्रूने नेहमीप्रमाणे नम्रपणे ते याबाबतीत काहीच करू शकत नसल्याचे सांगत कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार नोंदवण्यास सांगितले. मी हे सर्व लिहतोय कारण डिजीसीएने यात लक्ष घालावे. कारण या दोन मोठ्या कंपन्यांचा जो ‘चलता है’ अॅटिट्यूड आहे विमानाच्या मेनटेनेन्स आणि सुरक्षा नियमांपर्यंत पोहचू नये, असे जाखर यांनी ट्विट केले आहे.