‘नीलकमल’ दुर्घटनेनंतर बंदर विभागाला खडबडून जाग आली आहे. प्रशासनाने बोटमालकांना कडक इशाराच दिला असून क्षमतेपेक्षा एक प्रवासी जरी जादा घेतलात तर खबरदार.. कडक कारवाई करू असे दरडावले आहे. तसेच बोटीमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट घालणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उरण, भाऊचा धक्का, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावर प्रवास करणाऱ्या पर्यटकांसह प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
बुधवारी नीलकमल बोटीला झालेल्या भीषण अपघातानंतर बंदर विभागाचे डोळे उघडले आहेत. जाग आलेल्या बंदर विभागाने याबाबत आदेशच जारी केले आहेत. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासी व पर्यटकांना बोटीत बसण्याआधीच लाईफ जॅकेट घालण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बोटीत क्षमतेपेक्षा एकही प्रवासी जास्त घेतलात तर खबरदार, अशी कडक तंबीही बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती लाँच मालकांनी दिली. दरम्यान बंदर विभागाच्या फतव्याला नंतर मुंबई- गेट वेसह मोरा-मुंबई सागरी मार्गावरील प्रवासीही आता लाईफ जॅकेट घालूनच प्रवास करीत असल्याचे जलवाहतूक संघटनेकडून सांगण्यात आले.
मोरा-मुंबई जलवाहतूक महिन्यातून आठ दिवस बंद
कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही मोरा बंदर गाळात रुतले आहे. यामुळे महिन्यातून आठ दिवस मोरा-मुंबई जलवाहतूक बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर येते. मात्र या ढिसाळ कारभारामुळे नोकरी-व्यवसायासाठी मुंबईत ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसतो. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही कानाडोळा केला जात असल्याने प्रवाशांनी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.
मोरा बंदरातील गाळ हा आधुनिक पद्धतीने काढण्यात येत नसल्याने मोरा बंदर परिसरात गाळाची समस्या गंभीर झाली आहे. या गाळामुळे ओहोटी असली की प्रवासी बोटी भरसमुद्रात अडकून पडतात. १५ दिवसातून किमान चार दिवस या समस्येला सामोरे जावे लागत असून बोटी बंद असतात. त्यामुळे मुंबईत नोकरी करणाऱ्या कामगारांना याचा मोठा फटका बसत आहे. याचा विचार करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि जलवाहतूक विभागाने लक्ष घालून ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.