
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये काय घडले आणि सध्याची परिस्थिती काय आहे? याची माहिती दिली. नागपूर दंगलीत तीन पोलीस उपायुक्त जखमी झाले असून त्यापैकी एका पोलीस उपायुक्तावर थेट कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची धक्कादाय माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यामुळे यामध्ये एक प्रकारे काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या मुद्द्यावर राजकारण तापले असतानाच सोशल मीडियावर डॉ. स्वप्नील चौधरी यांची ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत आली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले.
दगडासोबत धोंडे आले, कळपाकळपाने गेंडे आले.
दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले
गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसाचं मरण झालं
चल दंगल समजून घेऊ, खरंखोटं तपासून पाहू
असे सांगत त्यांनी दंगल आणि त्यामागचे कारण, राजकारणी, राजकारण, त्यांचा गोतावळा आणि पसरवण्यात येणाऱ्या बातम्या यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. अशा घटना रोखण्यासाठी आपण सतर्क राहत त्याचे कारण समजून घेत हे प्रकार टाळायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.