मोतीलाल नगरही अदानीला, 36 हजार कोटींची बोली

धारावीपाठोपाठ आता गोरेगावच्या मोतीलाल नगरचा पुनर्विकासदेखील अदानी समूह करणार आहे. तब्बल 36 हजार कोटी रुपयांची बोली लावून अदानीच्या पंपनीने हा पुनर्विकास प्रकल्प मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर ही वसाहत तब्बल 142 एकर जागेवर वसलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिस्पर्धी एल अॅण्ड टी कंपनीच्या तुलनेत अदानीच्या पंपनीने म्हाडाला अधिक म्हणजे 3.97 दशलक्ष चौरस मीटर बिल्टअप एरिया ऑफर करत हा प्रकल्प मिळवला आहे. एल अॅण्ड टी कंपनीने म्हाडाला 2.6 दशलक्ष चौरस मीटर बिल्टअप एरिया ऑफर केला होता. मोतीलाल नगरचा पुनर्विकास खासगी विकासक कंपनीमार्फत करण्याची म्हाडाने केलेली मागणी गेल्याच आठवडय़ात उच्च न्यायालयाने मान्य केली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे वित्तीय निविदा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला होता.