ट्रम्प आता युरोपियन महासंघावर लादणार अतिरिक्त आयातशुल्क, व्यापार युद्धाच्या भडक्यात आणखी तेल ओतले

कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर अतिरीक्त आयातशुल्काच्या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युरोपियन महासंघाकडे मोर्चा वळवला आहे. युरोपियन महासंघातील तब्बल 28 देशांकडून आयात होणाऱया मालावर अतिरीक्त आयातशुल्क लादण्यात येणार आहे. या निर्णयामुळे व्यापार युद्धाच्या भडक्यात अमेरिकेने आणखी तेल ओतल्याचेच समोर आले आहे.

अमेरिकेकडून लाभ घेण्याचेच सर्व देशांचे धोरण असून देशाला तब्बल 300 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होत आहे. युरोपियन महासंघावर आयातशुल्क कधी लादणार याबाबत इतक्यात सांगता येणार नाही. परंतु, लवकरच याची सुरुवात होईल, असेही त्यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

युरोपियन महासंघातील देश जोरदार उत्तर देणार

युरोपियन महासंघाने ट्रम्प यांच्या या निर्णयाला जोरदार उत्तर देण्यासाठी पंबर कसली आहे. सध्या तरी युरोपियन महासंघाच्या उत्पादनांवर अतिरीक्त आयातशुल्क लादण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव असल्याची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही असे युरोपियन महासंघाच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच व्यापारसंबंधात अमेरिकेने अशाप्रकारे अतिरीक्त आयातशुल्क लादले तर आम्हीही कठोर भूमिका घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय विकास संस्थेतील अधिकारी, कर्मचारी सक्तीच्या रजेवर

अमेरिकेतील एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास संस्थेतील दोन उच्च अधिकाऱयांसह अनेक कर्मचाऱयांना शनिवारी रात्री उशिरा रजेवर पाठवण्यात आले. ही संस्था गुन्हेगारी संस्था आहे. हे थांबवण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया एलन मस्क यांनी एक्सवरून दिली आहे. एलन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागाच्या कर्मचाऱयांनी एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलमेंटच्या मुख्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेची आर्थिक मदत थांबवणार

दक्षिण आफ्रिकेला देण्यात येणारी आर्थिक मदत रोखण्यात येईल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे सरकार तेथील लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील धोरणांबाबत तपास पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत थांबवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी टथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याबाबतची घोषणा केली. तेथील सरकार लोकांना अतिशय वाईट वागणूक देत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान, ट्रम्प सरकारने दक्षिण आफ्रिकेतील नवीन कायदे समजून घेतले पाहिजेत, असे दक्षिण आफ्रिकेतील सरकारने म्हटले आहे. तसेच जमीन जबरदस्तीने बळकावणार नाही, जमीन मालकांशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानवर अप्रत्यक्ष परिणाम -सीतारामन

कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर अतिरीक्त आयातशुल्क लादण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष परिणाम हिंदुस्थानच्या व्यापारावरही होईल, अशी भीती हिंदुस्थानच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. भविष्यात अमेरिकेकडून हिंदुस्थानबाबत घेतल्या जाणाऱया निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही सतर्क आहोत. परंतु, नेमका काय परिणाम होईल हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मेक्सिकोवरील आयातशुल्क रोखले

अमेरिकेसोबत सीमेच्या मुद्दय़ावरून चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोवरील 25 टक्के आयातशुल्क एक महिन्यासाठी रोखल्याचा दावा मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाऊडिया शिबनाम यांनी केला आहे. त्याचबरोबर सीमेवर 10 हजार राष्ट्रीय सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील आणि अंमली पदार्थांच्या तस्करी रोखण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे ठरल्याचेही त्यांनी सांगितले.