चांगले तयार होऊन, कपडे, भेटवस्तू पॅक करुन तुम्ही विमानाद्वारे नातेवाईकांना, कुटुंबियांना भेटायला निघालात. विमानात बसल्यावरही तुमचा उत्साह कमी झालेला नसेल आणि 9 तास हवेत गिरक्या घेऊन, 7000 किलोमीटरचा प्रवास करून जिथून उड्डाण घेतले तिथेच विमान उतरले तर? तुमच्या उत्साहावर विरजण पडणे साहजिक आहे. असाच प्रकार ब्रिटीश एअरवेजद्वारे प्रवास करणाऱ्या 300 प्रवाशांसोबत घडला आहे. हे विमान लंडनहून यात्रेकरूंना घेऊन अमेरिकेच्या दिशेने निघाले होते, मात्र पुन्हा 9 तासांनी लंडन विमानतळावरच उतरले.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सकाळी ब्रिटीश एअरवेज कंपनीचे विमान 195 लंडनहून अमेरिकेच्या ह्यूस्टनच्या दिशेने रवाना झाले होते. हा प्रवास जवळपास 10 तास आणि 20 मिनिटांचा आहे. बोइंग-987-9 ड्रीमलायनरचे हे विमान लंडनहून वेळेत निघाले. जवळपास 5 तास हे विमान हवेत होते आणि न्यूफाउंडलँडच्या किनारी भागात पोहोचले होते.
विमानाने संपूर्ण अटलांटिक महासागर पार केला होता. ह्यूस्टनचे विमानतळही जास्त दूर नव्हते. मात्र अचानक पायलटने हवेतच यू टर्न घेतला आणि विमान पुन्हा लंडनच्या दिशेने वळवले. तांत्रिक बिघाडामुळे विमान पुन्हा लंडनकडे वळवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विमानाने पुन्हा अटलांटिक महासागर पार केला आणि लंडन गाठले. हे विमान जवळपा तास हवेत होते आणि 7000 किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा लंडनला आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा पायलटने विमान पुन्हा माघारी वळवले. मात्र इच्छित स्थळी वेळेत पोहोचता न आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, ब्रिटीश एअरवेजने प्रवाशांची माफी मागितली असून त्यांच्यासाठी दुसऱ्या विमानाचीही व्यवस्था केली. तसेच या घटनेमुळे कोणाचे काही नुकसान झाले असेल तर ते भरण्याची तयारीही दर्शवली.